मुंबई । Mumbai
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
त्यामुळे छगन भुजबळ हे कुठला वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तीनही पक्षांचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात स्थापन झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेकांचा शपथविधी सोहळाही पार पडला. पण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.
महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये खातेवाटपावरून एकमत होत नव्हते. मात्र, आता या खातेवाटपावर एकमत झाले असून, त्याची यादीच समोर आली आहे. यामध्ये भाजपकडे अनेक महत्त्वाची खाती असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असणार आहे. महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या तीन नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यात आली आहे.
दरम्यान, सत्तास्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांनी गृहखात्यावर दावा केला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. कारण, आता झालेल्या खातेवाटपात त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे भाजपने हे खाते त्यांच्याकडे ठेवल्याचे दिसत आहे. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगर विकास तर अजित पवार यांच्याकडे अर्थखाते देण्यात आले आहे.