नाशिक | Nashik
महायुतीला (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) २३७ जागांवर घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आले होते. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील पक्षांनी नवा आणि जुना असा समतोल साधत मंत्रिपदाची संधी दिली होती. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आले होते. त्यामुळे भुजबळ नाराज झाले होते. तसेच त्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर भाषणातून बोलून देखील दाखवली होती.
अखेर भुजबळ यांच्या नाराजीची दखल घेत पक्षाने त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली. यानंतर छगन भुजबळ यांनी (मंगळवारी) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आज (गुरुवार) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाशिकमध्ये (Nashik News) आगमन झाले. यावेळी ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांनी उत्साहात स्वागत केले. तसेच भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आयोजित स्वागत समारंभाला हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमावेळी बोलतांना भुजबळांनी विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “मला माध्यमांनी विचारले की, तुम्ही म्हणाले होते, ‘जहा नही चैना वहा नही रहेना’ मग मी म्हणालो ‘देर आये दुरुस्त आये’ काही लोक थोड्या वेळ या घरात तर थोड्या वेळ त्या घरात असतात, अशा लोकांना हे दु:ख कळणार नाही. भुजबळांचे भुज “बळ” हे तुम्ही आहात. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घर बांधण्याचे काम केले. एकत्र घर बांधले पण काही कारणांनी वेगळे झालो तेव्हा खूप दुःख झाले”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी त्यावेळीच सांगितलं होतं की दुरुस्त करायला पाहिजे. मला मंत्रीपदाचे आधीच माहिती होते. पण, मी कुठेच वाच्यता केली नाही. माझ्या पीए लोकांना पण माहीत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले. अखेर शपथविधी झाला. मी नऊ, दहा वेळा मंत्री झालो, मला त्याचा आनंद झाला. मी नाशिकचा बालक आहे. त्यामुळे पालक कोण होईल त्याची काळजी करू नका, बालक तुमच्यासोबत आहे. त्यावर एकवेळ मुख्यमंत्री यांच्याशी बोलेल. पण आपले कोणतेच काम अडणार नाही”, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
तसेच “आता पुढे निवडणुका (Election) असून, त्या आपल्याला जिंकायच्या आहेत. आम्ही जेलमध्ये अडकलो होतो तेव्हा देखील आत बसून आपले लोक सभापती केले. तुम्ही जर अजितदादांच्या जास्त जागा निवडून दिल्या तर फायदा होईल. सगळ्यांना बरोबर घेऊन आता निवडणूक लढायची आहे. अजितदादांनी सुद्धा म्हटले आहे की, आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाणार, सगळ्यांना सोबत घेऊन महानगरपालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीत सगळ्यांना संधी द्यावी लागेल, पडला तरी चालेल पण तो घटक आपला आहे”, असे म्हणत छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना (Worker) निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.