Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal : "महायुतीमध्ये भाजपच…"; मंत्री भुजबळांचा 'त्या' विधानावरून यू-टर्न

Chhagan Bhujbal : “महायुतीमध्ये भाजपच…”; मंत्री भुजबळांचा ‘त्या’ विधानावरून यू-टर्न

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची (Ajit Pawar Group) महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीत (Mahayuti) अजित पवार गटाला विधानसभेच्या निवडणुकीत ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिला असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. यानंतर भुजबळांनी या विधानावरून यू-टर्न घेत ‘भाजपच मोठा भाऊ’ असल्याचे म्हणत नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

हे देखील वाचा : “अजितदादा भाजपला आताच सांगा की, विधानसभेला…”; लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांची मोठी मागणी

यावेळी भुजबळ म्हणाले की, “मी केवळ चर्चेची आठवण करुन दिली की, याबाबत आता सतर्क राहा आणि ऐनवेळी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही आम्हाला जे सांगितले आहे त्याप्रमाणे घडवून आणा. आम्हाला जे सांगितले तेच मी पक्षाच्या बैठकीमध्ये बोललो. याबाबत कुठेही बाहेर बोललेलो नाही. भाजप हा आमच्या महायुतीमध्ये मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार. एवढा काही मी मूर्ख नाही की त्यांना कमी आणि आम्हाला जास्त जागा द्या असे सांगायला,” असे स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) दिले.

हे देखील वाचा : निलेश राणेंनी भुजबळांना सुनावलं; म्हणाले, “आम्हीच का सहन…”

दरम्यान, भुजबळांनी केलेल्या या विधानानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि जागावाटपाचा योग्य तो फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तिन्ही पक्षाला जागा मिळतील. महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने आम्हाला सर्वात जास्त जागा मिळतील. मात्र, आमच्या बरोबरच्या दोन्ही पक्षांचा सन्मान केला जाईल”, असं फडणवीसांनी म्हटले होते. त्यानंतर आज भुजबळांनी आपल्या विधानावरून यू-टर्न घेत एकप्रकारे नरमाईची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा : महायुतीत मिठाचा खडा? भुजबळांच्या ‘त्या’ विधानावरून सेना-भाजप नेत्यांमध्ये नाराजी

महायुतीमध्ये धुके निर्माण करू नका

भुजबळांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, लोकसभेचे जागावाटप असेल किंवा विधानसभेच्या जागावाटपाबाबत काही मागणी असेल, तर ती मीडियाच्या माध्यमातून कधीही होत नाही. यातून काही कारण नसताना अडचणी आणि समस्या निर्माण होतात. विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही मत असेल किंवा इतरांचे मत असेल, त्यावर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली पाहिजे. मीडियाच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्यात, असे म्हणणे गैर आहे. यामध्ये तुम्हाला कोणी आश्वस्थ केले, याचा कोणताही पुरावा नसतो, तरीही सांगायचे असेल तर स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आम्हाला एवढ्या जागा देण्यासंदर्भात या नेत्यांने शब्द दिला होता. पण अशा प्रकारचे धुके निर्माण करण्यात काहीही कारण नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले होते.

हे देखील वाचा : Nashik Crime News : माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर प्राणघातक हल्ला; दोघे गंभीर

भुजबळांना महायुतीमध्ये तेढ निर्माण करायचा आहे का?

शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले होते की, भुजबळांना अशा प्रकारची विधाने करून महायुतीमध्ये तेढ निर्माण करायचा आहे. जागावाटपाबाबत महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते निर्णय घेतील. युतीच्या अटी लक्षात ठेवा,बाहेर तुम्हाला असे विधान करून काय सिद्ध करायचे आहे. राष्ट्रवादीला जागावाटपासंदर्भात इतकी घाई का आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून ४ महिने बाकी आहे. त्यामुळे निवडणुका आल्या का बघू, या विषयावर आज बोलणे योग्य नाही. लोकसभेचे निकाल लागू द्या. एकत्र राहायचे असेल तर एकमेकांना समजून घेऊन पुढे जायला पाहिजे, असे शिरसाट यांनी म्हटले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या