पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
दिवाळीनंतर कार्तिक चतुर्थीच्या दिवशी होणारा उत्तर भारतीय बांधवांच्या छटपूजेचा सोहळा आज (ता.७) सायंकाळी गोदाघाटावर मावळत्या सूर्याला अर्घ्य देत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्रतस्थ महिला व पुरुषांनी नदीपात्रात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून छटमातेचे मनोभावे पूजन केले. उद्या (ता.८) सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर व्रताची विधिवत सांगता होईल.
कार्तिक शुध्द षष्ठी अर्थात गुरूवारी (ता.७) सूर्यास्त होण्याच्या दोन तास अगोदर गोदापात्रात उभे राहून मावळत्या सूर्याची पूजा करण्यात आली. सूर्य अस्ताला गेल्यावर अर्घ्य देऊन याठिकाणी मांडण्यात आलेली पूजा सामुग्रीची मनोभावे पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी नदीपात्रात उसाचे तोरण उभारून जवळच टोपली व सूप यामध्ये विविध प्रकारचे फळं ठेवून व धूप दीप लावून मनोभावे पूजन करण्यात आले. उत्तर भारतीयांच्या गर्दीने सायंकाळनंतर गोदाकाठावर पाय ठेवायलाही जागा नव्हती.
उत्तर भारतीय बांधवांची दुपारी चार वाजेनंतर गोदाघाटावर गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्यावर पोलिसांनी रामकुंडाच्या दिशेने येणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. रामकुंडासह लक्ष्मण कुंड, गांधी तलाव, धनुष कुंड, सीता कुंड, दुतोंड्या मारुती, गाडगे महाराज पूल पात्र पासून गाडगे महाराज पुलापर्यंत उत्तर भारतीय बांधवांनी छट पूजेसाठी गर्दी केली होती.
यानिमित्ताने रामकुंडावर गांधी तलाव जवळ गणराज सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भोजपुरी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गणराज सेवाभावी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे उमापती ओझा यांसह मान्यवर व उत्तर भारतीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.