मुंबई | Mumbai
नुकतेच छत्रपती शिवाजी महारांच्या इतिहासाबाबत मंत्री नितेश राणेंनी मोठा दावा केला होता. छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असे नितेश राणेंनी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून जोरदार टीका देखील करण्यात आली. त्यानंतर आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्री नितेश राणे यांचा दावा खोडून काढला आहे. नितेश राणे भावनेच्या भरात बोलले असल्याचे उदयनराजेंनी म्हटले आहे.
काल नागपूरमध्ये दोन समजात उसळलेल्या हिंसाचारामध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे. या हिंसाचारात अनेक पोलिस अधिकारीही जखमी झाले आहेत. त्यावर पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिदुस्थानचे दैवत आहेत. शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया घातला. त्यांच्या सैन्यामध्ये अनेक समाजाचे मावळे होते. अनेक मुस्लीमही त्यांच्या सैन्यात होते. मात्र काल नागपुरात जी घटना झाली आहे. ती निंदास्पद आहे. या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली.
“मला वाटते नितेश राणेंनी भावनेच्या आहारी जाऊन असे वक्तव्य केले असावे. कारण ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल केले गेले. स्वाभाविक आहे आपण या रागापोटी एखादे मत व्यक्त करतो,” असेही उदयनराजेंनी म्हटले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी नितेश राणेंच्या दाव्यावर भाष्य केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण फौज किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. मुस्लीम, हिंदू आणि इतर समाजातील लोकही होते. असे काही नाही की फक्त मराठा समाजातील लोक होते. मुस्लीम समाजातील लोकही होते आणि ते जबाबदारीच्या पदावर होते,” असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला हवी. त्यासाठी कायद्यात बदल करणे गरजेचे आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे म्हणत उदयनराजे यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने लोकांमध्ये व्देश पसरवण्याचे काम केले. औरंगजेब महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केले. इथे येऊन मंदिरांची तोडफोड केली. नासधूस केली. इथला सामाजिक सलोखा बिघडवला. त्यामुळे त्याचे उदात्तीकरण करणे योग्य नाही. नितेश राणे यांच्यावर बोलताना त्यांनी भावनेच्या भरात वक्तव्य केले असेल. सध्या राजीनामा मागणे ही फॅशन झाली आहे.
सर्वधर्म समभावचे विचार देशाला पुढे घेवून जातात. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा शाशन मान्य असणारा इतिहास प्रकाशित करावा म्हणजे वाद होणार नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा