अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिका निवडणूक ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून या प्रक्रियेत मतदारांचे योगदान महत्वाचे आहे. मनपा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरतील, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने मनपा स्वीप समितीच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी राबवावयाच्या विविध उपक्रमांचा आराखडा व अहवाल निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या माध्यमातून नुकताच निवडणूक निरीक्षकांना सादर करण्यात आला. मतदारांचे नियोजनबध्द शिक्षण आणि निवडणूक सहभागावर आधारीत विविध उपक्रमांचा यात समावेश आहे. यावेळी पथकातील अतिरिक्त जिल्हाधिकारी (जळगाव) श्रीमंत हरकर, स्वीप समिती सदस्य उपस्थित होते.
लोकशाहीला समृध्द करणार्या मतदान प्रक्रियेतील विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना देखील येत्या काळामध्ये प्रभावी ठरून निर्भयपणे व निरपेक्षवृत्तीने मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करतील, असा विश्वास हरकर यांनी यावेळी व्यक्त केला. महिला, नवमतदार यांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित करावे, अशी सूचनाही जीवने यांनी केली. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, प्रसिध्दी अधिकारी नितीन ब्राह्मणे, मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या स्वीप आराखड्यामध्ये मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
विविध उपक्रमाव्दारे मतदार जनजागृती
मतदार जनजागृतीसाठी रॅली, शोभायात्रा, मिरवणूक, सेल्फी पॉइंट, पथनाट्य ,विविध प्रकारच्या स्पर्धा तसेच नवमतदार जागृती, दिव्यांग, तृतीयपंथी तथा वंचित घटकातील महिलावर्ग यांच्यासाठी विशेष उपक्रम, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयक जनजागृती शिबिरे, मतदार जनजागृती शपथ, संकल्पपत्र, बाईक रॅली, दृकश्राव्य निर्मिती, मतदार जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा वापर, आयुक्तांशी संवाद, मनपा दौड, मतदार जागृतीचे हळदीकुंकू आदी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.





