नाशिक | प्रतिनिधी Nashik
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर येणार असून उद्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विठापिठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत.त्याच प्रमाणे सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी होणारी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. १ जून) होणार्या महत्त्वपूर्ण बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नाशिककरांचे लक्ष याकडे लागले आहे.
आखाड्यांसाठी विशेष वाहनव्यवस्था
या बैठकीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील तेरा प्रमुख आखाड्यांचे दोन दोन पदाधिकारी सहभागी होणार असून, त्यांच्यासाठी प्रशासनाने विशेष वाहनव्यवस्था केली आहे. प्रत्येक आखाड्यासाठी एक विशेष वाहन तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे साधू-महंतांचा प्रवास सुलभ आणि सन्माननीय होईल.
सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा अलर्ट
मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सुरक्षा बंदोबस्ताची तपासणी केली आहे. वाहतूक नियमन, प्रवेश मार्ग आणि पार्किंग व्यवस्थेबाबत वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. कर्मचारी आणि अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
बैठकीला तीन मंत्री व १३ आखाड्यांचे महंत
सिंहस्थ कुंभमेळा बैठकीला तीन मंत्री उपस्थित राहणार असून, सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन,शिक्षणमंत्री दादा भूसे व अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे उपस्थिती राहणार आहेत. या सोबतच नाशिकचे ३ व त्र्यंबकेश्वरचे १० आखाड्यांचे महंत या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.
प्रत्यक्षात यापूर्वी नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या संत महंतांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या जात होत्या. यंदा पहिल्यांदाच दोनही ठिकाणच्या आखाडाप्रमुख एकत्र येणार आहेत.





