Tuesday, January 6, 2026
Homeनाशिकनेमबाज स्वप्नील कुसाळेला पारितोषिक जाहीर

नेमबाज स्वप्नील कुसाळेला पारितोषिक जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

- Advertisement -

मुंबई / प्रतिनिधी

YouTube video player

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे. कोल्हापूरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही शिंदे यांनी केली.

स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकविले आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने अभिनंदन, असे नमूद करून शिंदे यांनी यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज स्वप्नील कुसळेच्या वडिलांशी मोबाईलवरून संवाद साधत स्वप्नीलच्या यशाबद्दल त्यांचे आणि कुटुंबियांचे अभिनंदन केले. स्वप्नील मायदेशी परतल्यानंतर त्याची कोल्हापुरात भव्य मिरवणूक काढली जाईल, असेही मुश्रीफ यांनी यावेळी जाहीर केले.

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...