Sunday, January 26, 2025
Homeनंदुरबारदुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या

दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतरदेखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरीक अंतराचे पालन करावे यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

- Advertisement -

धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी, कृषि मंत्री दादा भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, आ.मंजुळा गावित, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

श्री.ठाकरे म्हणाले, शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात परंतु ग्रामीण आणि विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना अशा सुविधा मिळणे आवश्यक आहे.

कोविडचा धोका पुन्हा वाढला आहे. मात्र यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून त्यात यापुढेही सातत्य ठेवण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

तोरणमाळ पर्यटन विकास आराखडा तयार करा

तोरणमाळ पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, पर्यटन विकासाच्या माध्यमातून येथील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

ते म्हणाले, विकास आराखडा तयार करताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. परिसरात पळसाची झाडे रांगेत लावण्यासारख्या पर्यटकांना आकर्षित करणार्‍या संकल्पना राबवाव्या. लवकरच पर्यटनमंत्र्यांच्या समवेत याबाबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या