Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री सहाय्यता कक्ष गरजू रुग्णांसाठी वरदान

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष गरजू रुग्णांसाठी वरदान

नाशिक । मोहन कानकाटे Nashik

गरीब कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस दुर्धर आजार झाल्यास त्याच्यावर उपचार करणे पैशांअभावी शक्य होत नाही. याचा विचार करून 2014 मध्ये राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यावर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची ( Chief Minister’s Medical Assistance Room)संकल्पना फडणवीस यांच्यापुढे मांडली. त्यानंतर चिवटे यांनी सातत्याने त्याबाबत पाठपुरावा केला. अखेर सरकारी कारभाराच्या चौकटीत बसवून फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू केला होता.

- Advertisement -

त्यावेळी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी मंगेश चिवटे यांच्या या संकल्पनेचे आणि त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले होते. मात्र राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, त्यावेळी हा कक्ष बंद करण्यात आला. त्यामुळे गरजू रुग्णांना मदत मिळणेही बंद झाले होते. यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडे चिवटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पुन्हा सुरू व्हावा यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांनाच या कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवत हा मदत कक्ष पुन्हा सुरू केला असून या कक्षामार्फत राज्यातील गरजूंना उपचारासाठी दोन लाखांपर्यंत मदत केली जात आहे.

गेल्या आठ महिन्यांत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत 4,800 गरजूंना 38 कोटी 60 लाख 33 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. यामध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये 1237 गरजूंना विक्रमी 10 कोटी 27 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हा राज्यभरातील गरजू रुग्णांसाठी जीवदान ठरत आहे.

कुणाला मिळेल मदत?

महात्मा फुले जनआरोग्य योजना व राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातून उपचार शक्य नसल्यास मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून मदत मिळते.

दोन लाखांपर्यंत मिळते मदत

खासगी रुग्णालयातील उपचारासाठी कमीत कमी 50 ते जास्तीत जास्त एक ते दोन लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

या आजारांचा समावेश

कॉकलियर इम्प्लांट (वय वर्षे 2 ते 6) हृदय, यकृत, किडणी, बोन मॅरो, फुफ्फुस, हाताचे व गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग, अपघात व लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसीस, अपघात, कर्करोग (किमोथेरपी/ रेडिएशन ) नवजात शिशूंचे आजार, बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण.

ऑनलाईन अर्ज सुविधा

दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारास मदत मिळण्यासाठी cmrf.maharashtra.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावरून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज (विहित नमुन्यात)निदान व उपचारासाठी लागणार्‍या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खासगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक)

तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक)

रुग्णाचे आधारकार्ड, लहान बाळासाठी आईचे आधारकार्ड

रुग्णाचे रेशनकार्ड

संबंधित आजाराचे रिपोर्ट

अपघातग्रस्त रुग्णांसाठी एमएलसी रिपोर्ट आवश्यक

प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी / शासकीय समितीची मान्यता आवश्यक

रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत गरजूंना 14 कोटींची सवलत दिली असून त्यामाध्यमातून जवळपास अडीचशे ते तीनशे रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिवसाला जवळपास दोन रुग्णांना पाठवत असतो. हे सर्व कार्य मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे.

– योगेश म्हस्के, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या