वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
वैजापूर शहरातील लाडगाव रस्त्यावरील घरासमोरून तीन वर्षाच्या मुलाचे आयशर टेम्पोमधून अपहरण केल्याचा प्रकार काल शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. घरच्या मंडळींनी क्षणाचाही विलंब न लावता याबाबत पोलिसांना व नातेवाईकांना कळवल्याने अपहणकर्त्याचा प्रयत्न फोल ठरला. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने हा टेम्पो कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे पकडून अपहरणकर्त्याला ताब्यात घेतले. बाजीराव भानुदास कांदळकर (वय 45) असे आरोपीचे नाव असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी आहे.
याबाबत अपहरण झालेला कुणाल गणेश फुलारे रा. लाडगाव रोड, वैजापूर याची आई माधुरी फुलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुध्द वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी फुलारे या पती, सासू, दीर व आई व मुलासह लाडगावरोड येथे राहतात व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचा तीन वर्षाचा मुलगा कुणाल हा आजी लताबाई यांच्यासोबत अंगणात होता. लताबाई या काही वेळासाठी घरात आल्या. मुलासोबत कुणी नसल्याची संधी साधत रस्त्यावरून भुसा घेऊन जाणार्या टेम्पो (क्रमांक एमएच 14 बीजे 4132) चालकाने टेम्पो थांबवून मुलाला जबरदस्तीने टेम्पोत बसवून पलायन केले.
त्यानंतर काही वेळातच लताबाई या घराबाहेर आल्या त्यावेळी मुलगा अंगणात नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी तेथील लोकांनी मुलाला एकाने गाडीत टाकून नेल्याचे सांगितले. त्यामुळे आई माधुरी व नातेवाईकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना हकीकत सांगितली तसेच संवत्सर येथील नातेवाईकांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत आरोपी बाजीराव यास संवत्सर येथे जेरबंद करून कुणाल यास सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले. दरम्यान या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.