Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारबिबटयाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

बिबटयाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

अक्कलकुवा/तळोदा । Akkalkuwa/Taloda । प्रतिनिधी/ता.प्र. –

अक्कलकुवा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असणार्‍या देवमोगरा पुनर्वसन शिवारातील शेतात घरातील अंगणात जेवण करणार्‍या सात वर्षीय बालकाला बिबट्याने उचलून नेत जवळच्या शेतात नेऊन ठार केल्याची घटना काल दि. 4 रोजी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की दि.4 रोजी संध्याकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान पुनर्वसन शिवारातील शेता समोरील आपल्या घराच्या अंगणात सुरेश भाईदास वसावे हा सात वर्षीय बालक जेवण करत होता. त्यावेळी अचानक बिबट्याने सुरेशवर हल्ला करुन त्यास जवळच्या अमेरिकन मक्याच्या शेतात फरफटत नेले. त्यामुळे मुलाच्या काकूने आरडाओरड करून सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली.

याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने तेथे पोलीस व वनविभाग कर्मचारी तेथे आल्याने जमलेल्या लोकांच्या मदतीने आजुबाजुच्या शेतामध्ये अंधारामध्ये शोध घेत असतांना घरापासून सुमारे तिनशे मिटर अंतरावर रामजी इरका पाडवी यांच्या मकाच्या शेतामध्ये मुलगा- सुरेश भाईदास वसावे हा मयत अवस्थेत मिळून आला. सदर बालकाच्या पृष्ठभागावर तसेच मानेवर लचके तोडले आहेत. बिबट्याने सदर मुलाच्या शरीरातील पूर्ण रक्त पिऊन घेतल्याने शरीर कोरडे पडले होते.

त्यानंतर आ. आमश्या पाडवी, वन विभागाचे वनक्षेत्रपाल एल.डी.गवळी, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत आदींनी घटनास्थळावर धाव घेऊन मुलाचा शोध घेतला. घटनेनंतर वन विभागाने जागेवर पंचनामा करून सदर बालकास शवविच्छेदनासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हलविले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष परमार यांनी शव विच्छेदन केले. आ.पाडवी यांनी पुर्ण घटना स्थळाची पाहणी करुन अधिकारी व मुलाच्या पालकांसह ग्रामीण रुग्णालय गाठले.

तेथे वैद्यकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व वन अधिकार्‍यां सोबत आवश्यक चर्चा करुन मुलाच्या कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सुचना दिल्या. आ.पाडवी यांनी तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ थांबून यंत्रणेकडून संपूर्ण पुर्तता करुन शव कुटुंबियांच्या ताब्यात दिले. त्यांना घरी पोहचवण्याची व्यवस्था केली. याबाबत भाईदास नाहल्या वसावे (रा देवमोगरा पूनर्वसन) यांनी दिलेल्या खबरीवरुन अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

शेतात मुक्कामासाठी राहू नयेः वनक्षेत्रपाल

खापर । khpar । वार्ताहर –

देवमोगरा येथे काल बिबटयाने बालकावर हल्ला करुन ठार मारल्याप्रकरणी वनविभागाने शेतकर्‍यांना शेतात मुक्कामासाठी राहू नये असे आवाहन केले आहे. परिसरातील लोकांनी रात्रीच्या वेळी मोकळ्या जागेवर फिरू नये व शेतकर्‍यांनी शेतात रात्री मुक्कामासाठी जाऊ नये, या परसरातील मकाचे पिक काढणीला आले आहे. त्यामुळे बिबट्याचा संचार असू शकतो. तरी रात्रीच्या वेळी मकाच्या शेतात जाऊ नये.

आपली जनावरे उघड्यावर न बांधता गोठ्यात किंवा बंदिस्त ठिकाणी बांधावीत. घटनास्थळी व जवळच्या परिसरात सापळा व कॅमेरे लावून पिंजरा लावण्यात येणार आहे. तसेच वन विभागाचे अधिक कर्मचारी गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल ललित गवळी यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या