Sunday, May 26, 2024
Homeनंदुरबारबिबटयाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

बिबटयाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

सोमावल, ता.तळोदा | वार्ताहर- SOMAVAL

आपल्या आजोबांसोबत शेतातून घरी परत येत असलेल्या एका दहा वर्षीय बालकावर पाठीमागून येऊन बिबट्याने हल्ला केला. यात बालक गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दलेलपूर शिवारात घडली. याप्रकरणी वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून पोलीसातही नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रानमहू ता.तळोदा येथील खेत्या पारशी वसावे व त्यांचा नातू गुरुदेव भरत वसावे हे आपल्या मालकीचे औत घेऊन दलेलपूर शिवारात शेतमालक गुलाब सत्तार धानका यांच्या कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी गेले होते.

कोळपणी संपल्यानंतर आजोबा व नातू आपल्या रानमहू गावाकडे येत असतांना एका ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गुरुदेव या दहा वर्षीय बालकावर जबर हल्ला करून त्यास ऊसाच्या शेतात फरफटत नेले.

हा प्रकार आजोबा खेत्या वसावे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बिबट्यावर काठीने वार केले. बिबट्याने सदर बालकास तेथेच सोडून पळ काढला. परंतू सदर बालकाच्या चेहर्‍यावर व मानेवर बिबट्याने गंभीर जखमा केल्याने अधिक रक्तस्राव झाला होता.

आजोबा व वडिलांनी बालकास ऊसाच्या शेतातून काढून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यास वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. ही घटना वन विभागास माजी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे यांनी कळवल्यानंतर उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील, वनक्षेत्रपाल स्वप्निल भामरे, वनरक्षक वासुदेव माळी व वनकर्मचार्‍यांनी रानमहू गावाकडे धाव घेतली व घटनास्थळी भेट दिली. शिवाय घटनेचा पंचनामाही केला. दरम्यान, खेत्या वसावे यांनी सदर घटनेबाबत पोलिसात खबर दिल्यावर तळोदा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

वनविभागाने लावला पिंजरा

बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्यानंतर गावकर्‍यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यानंतर पिंजरा लावण्याची कारवाई सुरू केली आहे. यापूर्वीही बिबट्या व मादीचा सतत मुक्त संचार सुरू आहे. एवढेच नव्हे अगदी दिवसाढवळ्यादेखील दोन तीन बिबटे हिंडताना दिसून येतात. त्यामुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.

आ.राजेश पाडवी यांची भेट

आ.राजेश पाडवी यांनी माहिती कळताच उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेतली. वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना देत त्यांनी वनविभागालाही कारवाई करण्याचे सूचित केले. दरम्यान विधिमंडळातही आ.राजेश पाडवी यांनी बिबट्याचा हल्ला व त्यामुळे होणारे नुकसान यावर आवाज उठवला होता. मात्र वनविभाग कारवाई करत नसल्याने यावर तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या