नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar
बोरलीपाडा ता.धडगाव येथे बालविवाह रोखण्यात धडगांव पोलीसांना यश आले असून अल्पवयीन मुलगी व वर मुलाच्या पालकांना पोलीसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
दि.12 जून 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना धडगांव तालुक्यातील पाडलीचा बोरलीपाडा गावात दि.13 व 14 जून 2023 रोजी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा चाँदसैली येथील तरुणाशी बालविवाह होणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने माहिती काढली. पथकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, तिचे कुटुंबीय व गावातील नागरिक तसेच वर मुलगा व त्याच्या कुटुंबीयांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करुन त्यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त केले. त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. तसेच अल्पवयीन मुलगी व वर मुलाच्या पालकांना धडगांव पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, पोलीस उप निरीक्षक प्रवीण महाले, पोलीस हवालदार राजेंद्र जाधव, महेश कोळी, पोलीस अंमलदार गणेश मराठे, सुर्यवंशी पाडली, पोलीस पाटील कालुसिंग पाडवी यांच्या पथकाने केली.