‘असर’च्या ताज्या अहवालानुसार खासगी शाळेत शिकणार्यांपैकी शिकवणीत सहभागी होणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 21 टक्के तर सरकारी शाळेत प्रवेश घेणार्या आणि शिकवणीला जाणार्या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण 12.5 टक्के इतके आहे. ही आकडेवारी विचार करायला लावणारी आहे. या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची आणि शिकणे म्हणजे हे समजून घेण्याची गरज आहे.
प्रथम संस्थेचा ‘असर’ अहवाल नुकताच प्रकाशित झाला. या अहवालात शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भाने प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. पण त्याचवेळी इतर गोष्टींची घेतलेली दखलही महत्त्वाची ठरते. यावर्षीच्या अहवालात पैसे देऊन शिकवणीत सहभागी होणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. अगदी पहिलीपासून शिकवणी सुरू करण्याकडे पालकांचा वाढलेला ओढा चिंतनीय म्हणायला हवा. स्पर्धेचे घोडे बनवण्यासाठी मुलांना शिक्षणाच्या यंत्रात लोटणार्या अनेक पालकांमुळे विद्यार्थी त्यांच्या जीवनातील शिक्षणाचा आनंद गमावून बसणार आहे.
असर अहवालानुसार पहिलीतील 10.2 टक्के, दुसरीत 13.6 टक्के, तिसरीत 15.4 टक्के, चौथीत 16.3 टक्के, पाचवीत 16.9 टक्के, सहावीत 16.2 टक्के, सातवीत 15.9 टक्के तर आठवीत 16.1 टक्के विद्यार्थी शिकवणीला जातात. सरासरी पहिली ते आठवीतील 15.1 टक्के विद्यार्थी शिकवणीत सहभागी झालेले आहेत. यातील सरकारी शाळेतील पहिलीत शिकणारे 8.0 टक्के विद्यार्थी तर खासगी शाळेतील 20.9 टक्के विद्यार्थी त्यात आहेत. सरकारी शाळेतील दुसरीत शिकणारे 11.1 टक्के तर खासगी शाळेतील 26.2 विद्यार्थी शिकवणीला जात आहेत. खासगी शाळेतील तिसरीतील 29.6 टक्के, चौथीतील 29.2 टक्के, पाचवीतील 20.9 टक्के, सहावीतील 19.3 टक्के, सातवीतील 19.8 टक्के, आठवीतील 16.5 टक्के विद्यार्थी शिकवणीला जातात. राज्यातील हे प्रमाण गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढते आहे. 2010 साली सरकारी शाळेतील सहा टक्के आणि खासगी शाळेतील 15.3 टक्के विद्यार्थी सहभागी होते. आता 2022 मध्ये म्हणजे गत बारा वर्षांत सरकारी शाळेतील 12.5 टक्के आणि खासगी शाळेतील 21.0 विद्यार्थी आहेत.
शिकवणीला गेल्यामुळे गुणवत्ता उंचावते का? ती किती प्रमाणात उंचावते? मुलांचे शिकणे समृद्ध होते का? किती अधिक गुण मिळतात? या सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची गरज आहे.
यासाठी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेण्याची गरज आहे. पहिली ते तिसरीतील वर्गातील विद्यार्थी शिकवणीला जातात हे अधिक चिंताजनक आहे. या वयातील विद्यार्थ्यांचे शिकणे हे पायाभूत स्वरुपातील असते. या वयात श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही कौशल्ये शिकणे अपेक्षित असते. गणितात संख्याज्ञान, संख्येची किंमत, संख्येवरील क्रिया शिकत असतात. या स्तरावर शिकण्याची प्रक्रिया होत असताना येथे कौशल्य प्राप्त करण्याबरोबर किमान संकल्पनांचे पायाभूत शिकणे अपेक्षित आहे.
साधारणपणे आपल्याकडे पाच ते सहा वर्षांचे मूल पहिलीत दाखल होते. आपल्याकडे साधारण साडेसहा तास शाळा चालते. मूल तेवढ्या वेळेत काही ना काही शिकत असते. त्यामुळे त्यांनाही मानसिक आणि शारीरिक थकवा येणे साहजिक आहे. शाळेनंतर ते लहानगे शिकवणीला जाते. शिकण्यासाठी मनाची प्रसन्नता हवी असते. ती नसेल तर शिकणे म्हणजे केवळ प्रक्रिया आहे.
या वयातील मूल 10 ते 12 तास झोपते. त्यानंतर शाळेत जाते. त्याच्या विकासासाठी खेळ, संवाद, घरातील आजी, आजोबा, आई-बाबांशी गप्पा मारणे, विविध कृती करणे महत्त्वाचे आहे. मात्र ते घडत नाही. प्रारंभिक शिक्षणासाठी मुलांना विविध स्वरुपाचे अध्ययन अनुभव घरातून मिळण्याची गरज असते. त्यासाठी घरातून शिक्षणासाठीच्या पूरक कृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याऐवजी मार्कांसाठीची तयारी केली जाते. शिक्षण म्हणजे काय तर केवळ शिकण्यासाठी वातावरण तयार करणे? आता शिक्षणासाठीच्या पूर्वतयारीसाठी शासनानेच वर्गात भाजी निवडणे, शेंगा फोडणे, तांदूळ, डाळ निवडणे, टायर फिरवणे, सागरगोटे खेळणे, मातीत बोटे फिरवणे, कागद फाडणे, गोट्या खेळणे, दोरीवर चालणे, शब्दखेळ, शब्दभेंड्या खेळणे या कृतींचा समावेश केला आहे. या वयात मुलांचे शिकणे होण्यासाठी त्यांना अधिक वेळ देणे, गाणी-गोष्टी सांगणे, त्याला घरातील छोट्या छोट्या कामांसाठी मदतीला घेणे, मुलांना स्वतंत्रपणे काम करू देणे, गोष्टी ऐकवणे आणि गोष्टी सांगण्याची संधी देणे महत्त्वाचे आहे. केवळ पुस्तकातील आशय शिकणे म्हणजे शिक्षण नाही. त्यापलीकडे आपल्या जीवनात जे जे करतो ते सारेच शिकणे असते. या गोष्टी करून देण्यासाठी पालकांनी घरच्या वेळेचा उपयोग करण्याची गरज आहे. कृती करत आनंद मिळवणे ही मुलांची गरज आहे.
शिकण्याची प्रक्रिया मुलांच्या गरजा लक्षात घेऊन व्हायला हवी. मोठ्यांची स्वप्ने असतात. मुले म्हणजे मोठ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे माध्यम झाले आहे. आपल्याला काहीतरी बनायचे होते, ते होता आले नाही. ते मुलांकडून पूर्ण व्हावे म्हणून पालक प्रयत्न करतात. त्यातून मुलांचे शिकणे आनंददायी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मार्कांपेक्षा शिकणे कसे होईल याचा विचार करायला हवा.
भविष्य आणि स्वप्न हे पायाभूत शिक्षणाचा पाया झाल्यानंतरच्या टप्प्प्याने यायला हवे. त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पालकांनी याकाळात मुलांना मुक्तपणे जगू देण्याची संधी कशी मिळेल, हे लक्षात घ्यायला हवे. उत्तम बोलता येणे, निरीक्षण करता येणे, तुलना करणे, भेद जाणता येणे, संवाद करता येणे हे शिकणे आहे. हे शिकणे पुस्तकाबाहेर आहे, हे लक्षात घ्यायला हवे. या स्तरावर आनंदाची वाट निर्माण झाली तरच भविष्यात शिक्षणाची वाट चालण्याची शक्यता आहे.
पालकांना शिक्षणापेक्षा मुलांचे मार्क हवे आहेत. शिक्षण कसे होते याचा विचार केला जात नाही. परीक्षेत किती मार्क पडले यावर शिक्षणाचे मूल्यमापन होते. त्यामुळे जीवनासाठी शिक्षणाचा विचार, संस्कार, संवेदना, सहकार्य, श्रमप्रतिष्ठा, धर्मनिरपेक्षता यांसारखी अनेक मूल्य, जीवनकौशल्य, गाभा घटक, 21व्या शतकासाठीची कौशल्ये यांचा विचार करण्यापेक्षा फक्त मार्क पालकांना महत्त्वाचे वाटत असेल तर आपण शिक्षणातून माणूस आणि समाज, राष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न पाहणे चुकीचेच ठरण्याचा धोका आहे.
मुले जेव्हा शाळा आणि शिकवणीला जातात तेव्हा शाळेत शिकवले जाणार आहे मग तेथे लक्ष देण्यापेक्षा शिकवणीला लक्ष देऊ, शिकवणीला गेले की मग शाळेत लक्ष देता येईल अशा मन:स्थितीत ते दोन्हीकडे शिकत नाही. त्यामुळे शिकलेले पक्के होण्यासाठी चिंतन, मननाची गरज आहे. त्यासाठी वेळ द्यायला हवा. एकाच प्रकारच्या सातत्याच्या प्रक्रियेमुळे मुलांचा थकवा येतो आणि शिकण्याचा प्रवास थांबतो. म्हणून विचार करायला हवा.