अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नायलॉन चायना मांजावर बंदी असताना, अहिल्यानगर शहरात त्याची सर्रास विक्री होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी नायलॉन चायना मांजाची विक्री होत असलेल्या सावेडी उपनगरातील तीन ठिकाणी सोमवारी कारवाई करून 51 हजार 200 रुपये किंमतीचा मांजा जप्त केला. या प्रकरणी तिघा विक्रेत्यांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अहिल्यानगर शहरात सर्रास नायलॉन चायना मांजाची विक्री होत आहे. यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी पाईपलाईन हाडको व सिव्हिल हाडको परिसरात दोन ठिकाणी छापे टाकले. पाईपलाईन हाडको परिसरातील आंबेडकर चौक येथे शुभम सुनील वाघ (रा. पाईपलाईन हाडको, सावेडी) याला चायना मांजाची विक्री करत असताना पकडले. त्याच्या ताब्यातून पंचासमक्ष 16 हजार रुपयांचा मांजा जप्त केला. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुसरी कारवाई सिव्हिल हाडको परिसरातील गणेश चौक येथे केली. विकास अरविंद बरकसेरा (रा. गणेश चौक, सिव्हिल हाडको, सावेडी) याला नायलॉन चायना मांजा विक्री करताना पकडले. त्याच्या ताब्यातून 15 हजार 200 रुपये किंमतीचा मांजा जप्त केला आहे. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संदीप पवार, मयुर गायकवाड, चंद्रकांत कुसळकर, रवींद्र घुंगासे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अहमद इनामदार, दत्तात्रय कोतकर, सतिष भवर, बाळासाहेब भापसे, शिरीष तरटे यांच्या पथकाने जुना पिंपळगाव रस्त्यावरील सिध्दीविनायकनगर येथे छापा टाकून सचिन संभाजी उंडे (वय 26) याला पकडले. तो राहत्या घरातून नायलॉन चायना मांजाची विक्री करत असताना मिळून आला आहे. त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून 20 हजार रूपये किंमतीचा मांजा जप्त करण्यात आला आहे.
मनपाकडून कारवाई नाही
नायलॉन चायना मांजाच्या वापरामुळे यापूर्वी अनेक नागरिकांच्या गळ्याला, तर काहींच्या हाताला दुखापती झाल्या आहेत. मांजापासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन काही जण जखमी झाले आहेत. बंदी असलेल्या मांजावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेकडून यावर काहीच कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मांजावर कारवाईसाठी मनपाची पथके नियुक्त केली होती. यंदा मात्र अद्यापही मनपाकडून कारवाई होताना दिसत नाही.
मांजा वापरणार्यांवर कारवाईची मागणी
नायलॉन चायना मांजावर बंदी असली, तरी त्याची मागणी घटलेली नाही. लहान मुले व युवकांकडून चढ्या भावाने चायना मांजाची खरेदी केली जात आहे. मागणी असल्याने विक्रेतेही छुप्या मार्गाने विक्री करत आहेत. पोलिसांकडून विक्रेत्यांवर कारवाई केली जात असली, तरी वापर करणार्यांवर मात्र कोणतीही कारवाई होत नाही. या मांजामुळे होणार्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून वापर करणार्यांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.