राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यामधील चिंचोली येथील प्रवरा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी एक डंपर आणि एक ट्रॅक्टर असा सुमारे 23 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, संजय विखे, हवालदार शिवाजी नन्हे आणि देविदास कोकाटे यांच्या पथकाने 9 मे 2026 रोजी मध्यरात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास प्रवरा नदीपात्रात छापा टाकला. त्यावेळी काही जण अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आले. कारवाईदरम्यान एक जेसीबी चालक वाहनासह पसार झाला, तसेच ट्रॅक्टर चालकही घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी मात्र डंपर आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात यश मिळवले.
हवालदार देविदास कोकाटे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाणे येथे आरोपी सुनिल रमेश डेमरे आणि दिपक गडाख यांच्याविरोधात गु.र.न.481/2026 प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 15 आणि 3 अंतर्गत वाळू चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी सुनिल रमेश डेमरे याला पोलिसांनी अटक केली असून दुसर्या आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





