अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे 29 एप्रिल रोजी होणारी राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 24 एप्रिल रोजी मुंबई दौरा निश्चित झाल्यामुळे, बैठकीची नवी तारीख आता 6 मे ठरवण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने चोंडीतील बैठकीसाठी युध्दपातळीवर तयारी सुरू केली होती. बैठकीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून निविदाही प्रसिध्द करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी विविध विभाग प्रमुखांसमवेत बैठक घेऊन कामांची जबाबदारी विभागली. याशिवाय विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तयार झालेल्या यंत्रणेचा आढावा घेतला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिलपासून मुंबईत सुरू होणार्या इंडिया स्टील 2025 या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत. तीन दिवस चालणार्या या भव्य कार्यक्रमात देश-विदेशातील उद्योगपती, व्यापारी प्रतिनिधी, सरकारी अधिकारी आणि विविध राज्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी व राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांची उपस्थिती अपेक्षित आहे. 6 मे रोजी होणार्या मंत्रिमंडळ बैठकीत जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मांडले जाणार आहेत.
त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला संवर्धन, श्रीगोंदा येथील पेडगाव किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, तसेच नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याचे प्रस्ताव आहेत. याशिवाय जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडाही बैठकीत सादर केला जाणार असून, या सर्व प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे गतीमान रूप मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.