Wednesday, May 7, 2025
HomeनगरAhilyanagar : अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी वर्षात ऐतिहासिक निर्णयांचा वर्षाव

Ahilyanagar : अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी वर्षात ऐतिहासिक निर्णयांचा वर्षाव

अहिल्यानगर | सचिन दसपुते| Ahilyanagar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मग्राम चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी 681 कोटींचा विशेष विकास आराखडा राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी विविध विकासकामांनाही मान्यता देण्यात आली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुलींसाठी आयटीआय, राहुरी येथे नवीन दिवाणी न्यायालय अशा एकूण 11 महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले.

- Advertisement -

ही विशेष बैठक विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने चौंडी येथे मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित पत्रकार परीषदेत ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री विखे पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अहिल्यानगरसाठी अद्याप मंजुरी मिळाली नव्हती. मात्र आता 100 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

या प्रकल्पासाठी 485.08 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्यात आले आहे. तसेच अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 27 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंंत्रणेव्दारे भरावयाची 12 अशा एकुण 39 पदांना मान्यता देण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केवळ स्थापत्य नव्हे, तर श्रध्दास्थानांचे पुनरूज्जीवन करून आपल्याला सांस्कृतिक वारसा दिला. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून चौंडीचे स्मृतीस्थळासह राज्यातील सात प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी पाच हजार 503 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर केला.

यात चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन, अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोध्दार, श्री क्षेत्र तुळजाभवानी, त्र्यंबकेश्वर, महालक्ष्मी (कोल्हापूर), माहूरगड आणि ज्योतीबा मंदिर विकास आराखडा यांचा समावेश आहे. तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यभरातील 34 ऐतिहासिक जलस्रोतांचे संरक्षण, पुनरूज्जीवन आणि सुशोभीकरणासाठी 75 कोटी रूपयांची योजना राबविली जाणार आहे. यामध्ये घाट, कुंड, बारव, विहिरींचा समावेश आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात ‘आदिशक्ती अभियान’ व ‘आदिशक्ती पुरस्कार योजना’ राबविली जाणार आहे. या अभियानासाठी सुमारे 10.5 कोटी रूपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून, आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन आणि अत्याचार प्रतिबंध यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनव्दारे राबविण्यात येणार्‍या ‘मिशन महाग्राम’ या अभियानाला 2029 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 2025 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याच्या अध्यादेशास मान्यता देण्यात आली. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता अत्याधुनिक नियोजनासाठी हे प्राधिकरण उपयुक्त ठरणार आहे.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक आदी शहरांमध्ये उभारण्यात येणार्‍या वसतीगृह योजनेस ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतीगृह योजना’ असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येकी 200 विद्यार्थी क्षमतेच्या या वसतीगृहात मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या इंग्रजी निवासी शाळा योजनेस ‘राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला. 162 शाळांमध्ये 31 हजार 300 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून 288 कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत.

अहिल्यादेवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट
सांस्कृतिक कार्य विभागाने अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित मराठीसह विविध भाषांतील व्यावसायिक चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे जागतिक स्तरावर प्रदर्शन होणार असून, दूरदर्शन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तो उपलब्ध राहणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ हे कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे.

राहुरी येथे नवीन वरिष्ठ दिवाणी न्यायालय
विधी व न्याय विभागाने राहुरी येथे वरिष्ठ स्तराचे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. सध्या 4 कनिष्ठ न्यायालये कार्यरत असलेल्या राहुरीसाठी या नवीन न्यायालयामुळे प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील आणि नागरिकांचा वेळ व प्रवास वाचेल.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन, राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी पाच हजार 503 कोटींचा निधी.
– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती स्थळाच्या विकासासाठी 681 कोटी रूपयांचा आराखडा मंजूर.
– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणार.
– राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची स्थापना होणार.
– मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय कॉलेजची निर्मिती होणार.
– धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यशवंत विद्यार्थी योजना कार्यान्वित करणार.
– पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती.
– महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान व आदिशक्ती पुरस्कार
– नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2025 साठी प्राधिकरणाचा अध्यादेश काढणार.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या; कुठे घडली घटना ?

0
अकोले |प्रतिनिधी| Akole प्रेयसीला भेटायला गेला असता तिच्या नातेवाईकाने पाहिले व लाकडी दांडक्याने हातपाय व पाठीवर मारहाण करत जीवे मारून टाकल्याची घटना मंगळवारी (दि.5) पहाटे...