Friday, May 1, 2026
HomeनगरAhilyanagar : चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीचे काटेकोर नियोजन

Ahilyanagar : चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीचे काटेकोर नियोजन

सभापती शिंदेे यांची माहिती || सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

अहिल्यानगर/जामखेड |प्रतिनिधी| Ahilyanagar | Jamkhed

राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. ही बाब आपल्यासाठी निश्चितच भूषणावह आहे. प्रशासनामार्फत या बैठकीचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेल्या सूचनांची शिस्तबद्धरितीने अंमलबजावणी करावी. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावत बैठक यशस्वीपणे पार पाडण्याचे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. बैठकीसाठी येणार्‍या कुठल्याही व्यक्तीची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

चौंडी ता. जामखेड येथे 6 मे ला होणार्‍या मंत्रीमंडळ बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. राम शिंदे म्हणाले, चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी विविध समित्यांची स्थापना करुन अधिकार्‍यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आली आहे. प्रत्येक अधिकार्‍याने एकसंघपणे काम करत दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडावी. चौंडीकडे येणार्‍या सर्व रस्त्यांना दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. बैठकीसाठी मंत्रीमंडळाबरोबरच सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाहनांसाठी पुरेशा प्रमाणात पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. परिसरामध्ये अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

बैठकस्थानी वैद्यकीय पथक तैनात करण्यात यावे. रुग्णवाहिका, तात्पुरते रुग्णालय उभारण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात औषधी व मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. सुरक्षिततेच्यादृष्टीने अग्निशामक यंत्रणाही ठेवण्यात यावी. परिसरामध्ये स्वच्छता राहील याची काळजी घेण्यात यावी. बैठकीच्या दिवशी विद्युत पुरवठा सुरळीत व अखंडित राहील, यादृष्टीनेही आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रा. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

चौंडी येथे बैठकीसाठी करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. बैठकीसाठी उभारण्यात येत असलेला कक्ष, माध्यम कक्ष, भोजनकक्ष, सचिवालय कक्ष, ग्रीनरुम, हेलिपॅड तसेच पार्किंग व्यवस्थेची पाहणी करत व्यवस्थेमध्ये कुठलीही त्रुटी राहणार नाही तसेच हे काम विहित वेळेत पूर्ण होण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...