Thursday, June 13, 2024
Homeनगरचौंडी येथे आता पाणीत्याग आंदोलन

चौंडी येथे आता पाणीत्याग आंदोलन

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

- Advertisement -

चौंडी (ता. जामखेड) येथील धनगर समाज आरक्षासाठी सुरू करण्यात आलेल्या उपोषणाचा 15 वा दिवस आहे. उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथे हलवण्यात आले आहे. तर दुसरे उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांच्यासह इतर उपोषणकर्त्यांनी बुधवारपासून पाणीत्याग अंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, उपोषणस्थळी काही कार्यकर्त्यांनी मुंडन करत शासनाचा निषेध नोंदवला.

जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार आहोत. आरक्षणाचा वटहुकूम आमच्या हातात पडल्यावरच उपोषण सोडणार असल्याचा निर्धार बंडगर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान आज राज्यभरात विविध ठिकाणी धनगर समाजाच्या पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम अंदोलने झाली. यातील प्रमुख अंदोलन पुणे-बंगलोर महामार्गावरील खांबाटकी (जि. सातारा) घाट येथे झाले. यात धनगर समाजाच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांनी सहभाग नोंदवला. तर चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकास्थळी सुरेश बंडगर यांच्यसह अक्षय शिंदे पाटील, माणिकराव दांगडे, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळा गायके यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान काल सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सोनकाटे यांच्यासह धनगर समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी चोंडी येथे हजेरी लावत आंदोलनास पाठिंबा दर्शवला.

धनगर आरक्षणप्रश्नी आज मुंबईत बैठक

तोडग्याकडे सर्वांच्या नजरा

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

धनगर आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी आंदोलने, रास्ता रोको करण्यात येत आहेत. या दरम्यान आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आज गुरुवार दि. 21 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होत आहे.

या बैठकीसाठी चौंडी येथील उपोषणकर्त्या यशवंत सेनेच्या पदाधिकार्‍यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्यासह शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने येत आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या