शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डीत दुहेरी हत्याकांडाच्या घटनेत साईबाबा संस्थानच्या दोन कामगाराचा बळी गेल्यानंतर देखील शिर्डी शहरात गुन्हेगारी घटना सुरूच असून मंगळवारी दुपारी शिर्डीत किरकोळ वादातून एका तरुणाने दुसर्या तरुणावर चॉपरने वार केल्याची घटना घडली. यात वार करणार्या तरुणाला देखील झटापटीत कानाला जखम झाल्याने दोन्ही तरुणांनी परस्पर विरोधी फिर्यादी शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदविल्या आहेत.
मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी शिर्डी शहरातील गणेशवाडी परिसरात साई त्रिभुवन (वय 23, राहणार शिर्डी) या तरुणावर चार पाच अज्ञात तरुणांनी किरकोळ वादातून झालेल्या भांडणात पाठीमागून चॉपरने वार करून जखमी केले आहे. यात हल्ला करणारा देखील जखमी झाला आहे. ज्या तरुणावर हल्ला झाला होता तो तरुण जखमी अवस्थेत चॉपरसह शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याची अवस्था बघताच पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून त्यास उपचारासाठी साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमी तरुण व हल्ला करणाऱा देखील जखमी झाल्याने या दोघांना एकच दवाखान्यात दाखल केले आहे.
शिर्डीत पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याचे काम सुरू केले आहे. तसेच रात्रीच्या वेळी देखील पोलिसांची गस्त वाढवली आहे. तरी देखील शिर्डीत असा प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या घटने संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.