नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक शहरात नाताळला उत्साहात सुरुवात झाली. मध्यरात्री शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चवर आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. मध्यरात्री विविध चर्चमध्ये नाताळनिमित्त प्रार्थना व धार्मिक कार्यक्रम झाले. फटाक्यांच्या आतषबाजीने शहर दणाणून गेले.
आजपासून सलग दहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चर्च आकर्षक रोषणाई आणि येशू खिस्त जन्माच्या आकर्षक देखाव्यांनी सजले आहेत. ख्रिसमसचा आठवडा आणि मावळत्या वर्षाचा शेवटचा आठवड. या दोन्ही दिवसानिमित्त नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा उत्साह आणखीण द्विगुणीत करण्यासाठी नाताळ आणि नवर्षानिमित्त हॉटेल्स पहाटे उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे पहाटेपर्यत ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागत करता येणार आहे. त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
हॉटेल नेहमीप्रमाणे 11 किंवा 12 वाजता बंद होतात. मात्र आता नाताळ आणि नववर्षाच स्वागत करण्यासाठी हॉटेल जास्तवेळ सुरू रहावी, अशी मागणी नागरिक आणि हॉटेल मालकांकडून झाली होती. विनंतीला आता प्रशासनाने हिरवा कंदील दिल्याचे वृत्त आहेे.
जेलरोड। प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरात नाताळचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला (दि.24) रात्री ख्रिस्त जन्माची विशेष प्रार्थना (पवित्र मिस्सा) झाली. मध्यरात्री ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या तसेच ख्रिस्त जन्माची गीते घरोघरी जाऊन गात प्रभू येशूच्या जन्माचा संदेश दिला. जेलरोड येथील संत अण्णा चर्च, नाशिकरोड येथील बाळ येशु मंदिर, मुक्तीधाम समोरील चर्च येथे मध्यरात्री विशेष प्रार्थना झाली.
नाताळची तयारी एक डिसेंबरपासून सुरू झाली असून डिसेंबरच्या चार रविवारी चर्चमध्ये विशेष प्रार्थना होत आहेत. सर्वधर्मीय भाविक सेंट झेवियर्समध्ये बाळ येशूचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. चर्चमध्ये आगमन काळाचे चिन्ह म्हणून चार मेणबत्ती लावण्यात येत आहेत. पहिल्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती लावण्यात आली. तिला भविष्य वाणीची मेणबत्ती म्हणतात. चर्चमध्ये व प्रांगणात सुबक व सुंदर प्रकारे तार्यांची सजावट व ख्रिस्त जन्माचा देखावा तयार करण्यात आला आहे. तो पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
यंदा प्रभू येशूचे शांतीचे संदेश देणार्या देखाव्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. चर्चच्या एसएसव्हीपी संघटनेच्या सदस्यांनी रात्री शहरातील विविध रस्त्यावर झोपलेल्या गरीबांना ब्लँकेटचे वाटप केले. संत अण्णा महामंदिरात चार भाषेतून प्रार्थना झाली. 27 डिसेंबरला सकाळी आजारी व वृद्ध भाविकांसाठी विशेष प्रार्थना होणार आहे. नाताळच्या तयारीसाठी फादर गिल्बर्ट व फादर प्रमोद यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चचे युवक व भाविक परिश्रम घेत आहेत. नाताळनिमित्ताने विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होत आहेत.