श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी|Shrigonda
येथील चर्च जमीन घोटाळ्याप्रकरणी तहसीलदार, मंडलाधिकारी आणि दुय्यम निबंधक यांच्यासह दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि चर्चच्या पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. अन्यथा येत्या 20 जानेवारीला आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. संबंधितांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन या प्रकरणाची तक्रार केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे, शंभर वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या 28 एकर जमिनीचा बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे मालकी हक्क बदलण्यासंदर्भात तहसीलदारांच्या आदेशाला प्रांताधिकार्यांनी स्थगिती दिली आहे. दरम्यान, श्रीगोंदा न्यायालयाने देखील पुढील आदेशापर्यंत हि जमीन हस्तांतरण करण्यास मनाई केली असल्याने या जमिनीचा मालकी हक्क चर्चकडे कायम राहणार आहे.
या संस्थेच्या जमिनीची बेकायदेशीर कागदपत्राआधारे तहसीलदारांकडून जमीन मालकी हक्क नाव बदलण्याची परवानगी घेऊन संबंधित जमीन विक्री करण्यात आली होती.
याबाबत संस्थेच्या अध्यक्षांनी जमीन विक्रीसाठी मालकी हक्क बदलणारे, जमीन खरेदी-विक्री करणारे, तसेच श्रीगोंदा येथील तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्या संगनमताने मालकी हक्क बदलाच्या निर्णयाकडे प्रांताधिकार्यांकडे अपील तर न्यायालयात दावा दाखल केला होता. दरम्यान, चर्च जमिनीचा हा व्यवहार संशयास्पद असताना या प्रकरणात तहसीलदारांनी आदेश दिला. त्यामुळे जमीन विक्री व्यवहार झाला. ज्यांनी जमीन घेतली त्यांनी दोन वर्षांत जमीनीचे पैसे देणार असल्याचे दस्तावेजामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे दुय्यम निबंधकांची भूमिकाही संशयास्पद आहे. तहसीलदारांनी अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीर व्यवहार करणार्यांना मदत केली असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर 20 येत्या जानेवारीला आंदोलन करणार असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तहसीलदार रजेवर, कर्मचारी गायब
सध्या चर्च जमीन घोटाळा प्रकरणातील तहसीलदार रजेवर आहेत. अन्य एका नायब तहसिलदारांचे दालनही बंद होते. त्यामुळे मंगळवारी (दि.14) कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. निवासी नायब तहसीलदार मिलिंद जाधव कार्यालयात उपस्थित होते.