Saturday, July 27, 2024
Homeनाशिकज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत - कुलगुरू डॉ. सोनवणे

ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत – कुलगुरू डॉ. सोनवणे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नवीन शैक्षणिक धोरण समजून घेताना आपल्याला त्याच्या तांत्रिक बाबीही समजून घ्याव्या लागतील. भारतीय ज्ञानामध्ये भारतीय ज्ञानामागचे विज्ञान समजावून घ्यावे लागेल व ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्या लागतील, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले.

- Advertisement -

राष्ट्रीय शैक्षणिक सप्ताह अंतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व केटीएचएम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर केटीएचएम महाविद्यालयात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, संगमनेर मालपाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. प्रमोद रसाळ, प्राचार्य. डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. पी. व्ही. कोटमे, डॉ. व्ही. व्ही. बोरस्ते, डॉ. कल्पना आहिरे, डॉ. एस. एस. पाटील उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आम्हाला जागतिक नागरिक व्हायचे असून जगातील वेगवेगळ्या स्तरावरील वेगवेगळ्या विषयांवरील प्रश्न समजावून घेऊन त्याची माहिती, ज्ञान हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहे, असेही कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणात सहजता, समानता गुणवत्ता, सहज परवडणारे आणि जबाबदारी हे पाच महत्त्वाचे टप्पे विद्यार्थ्यांसाठी आहेत, चार वर्षीय पदवीमध्ये बहुशाखिय विविध पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम प्रादेशिक भाषेत शिकण्याची संधी, पदवीची चार वर्षे पूर्ण केल्यास ऑनर्स मिळणार, मात्र पदवी पूर्ण करताना विद्यार्थ्याला 50% क्रेडिट असणे गरजेचे आहे. ते तो बाहेरीलही विविध आवडीचे अभ्यासक्रम करून मिळवू शकतो, असे मालपाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरण दर 25 वर्षांनी बदलते. शिक्षण व्यवस्थेत बदल होणे महत्त्वाचे आहे. जे विद्यार्थी भारतातून पदवी घेतात ते पुढील शिक्षणासाठी विदेशात जातात. तेथील शिक्षण महागडे आहे, त्यांना ते शिक्षण भारतातही मिळायला पाहिजे. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले पाहिजे व ते त्यांनाही आनंददायी वाटले पाहिजे, असे आपल्या अध्यक्षीय मनोगतात मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सांगितले. या परिसंवादासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे डॉ. एस. डी. निकम तसेच नाशिक केंद्राचे वाल्मिक आगवन, हरिभाऊ बोरस्ते यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक डॉ. तुषार पाटील यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या