रमेश देव आपल्याला सोडून गेले. वय वाढले की वयाचे आकडे वाढतात आणि एक दिवस निसर्ग आपले काम करतो. पण रमेशजींच्या मनाला वाढत्या वयाचा स्पर्श कधीच झाला नाही. तो माणूस चिरतरुण होता. त्यांच्या चेहर्यावरचे हास्य कधीच ढळले नाही. त्यांनी कधीच कोणाला कमी लेखले नाही. मेहनतीने यश मिळवणार्या रमेशजींनी कधीही फुकाचा अभिमान मिरवला नाही. त्यांचे पाय कायम मातीचेच राहिले.
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन ही अत्यंत दु:खद बातमी आहे. त्यांच्याबरोबर एका भव्य-दिव्य कारकीर्दीचा अस्त झाला आहे. ‘अतिशय लव्हेबल व्यक्ती’ अशा शब्दात रमेशजींच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करता येईल. रमेशजींनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अमीट छाप उमटवली आहे. ‘गहिरे रंग’ या नाटकात देव दाम्पत्याबरोबर मी काम केले होते. त्यात ते नायक-नायिकेच्या भूमिकेत होते. यानिमित्ताने मला त्यांचा निकटचा सहवास मिळाला. त्यावेळी ते जुहूला ‘मेघदूत’मध्ये राहायचे. तिथे मी वारंवार जात असे.
मी मूळची कोल्हापूरची. देव दाम्पत्याला मी कोल्हापूरमध्ये प्रथम पाहिले ते शाळेकरी वयात असताना. त्यावेळी जयप्रभा स्टुडिओमध्ये त्यांच्या ‘सुवासिनी’ या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होते. त्याचे असिस्टंट डायरेक्टर मधुकाका कुलकर्णी माझ्या वडिलांचे परिचित होते. ते आम्हाला चित्रिकरण बघायला घेऊन जायचे. त्यावेळी सेटवर मी प्रथम त्या दोघांना पाहिले. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल, असे त्यावेळी अजिबात वाटले नव्हते. पण पुढे ही संधी मिळाली आणि त्यांच्या दिलखुलास वृत्तीचा, व्यक्तिमत्त्वाचा जवळून परिचय झाला. इतकी प्रसिद्धी, पैसा, मान मिळवूनही शेवटपर्यंत निरलस राहिलेले ते व्यक्तिमत्त्व होते. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रसृष्टी, रंगभूमीदेखील गाजवली. त्या दोघांबरोबर काम करणे हा सुखद अनुभव असे. पती-पत्नी म्हणून त्या दोघांचे संबंधही वाखाणण्याजोगे होते. त्यातही सीमाताई अधिक चोख. अभिनय, नाटकाचे डायलॉग पाठ करणे या सगळ्यातच त्यांना विलक्षण गती होती. दिलखुलास रमेशजी मात्र बरेचदा नाटकातले संवाद विसरायचे. त्यांचे संहितेकडे दुर्लक्ष व्हायचे. काम जबरदस्त असले तरी इतर व्यापात नाटकाची नक्कल पाठ करण्यात ते मागे पडायचे. अशावेळी सीमाताई त्यांच्याकडून पाठांतर करून घ्यायच्या. ‘नाही रमेश, तो संवाद तसा नाही असा आहे…’ असे त्यांच्यातले संभाषण मी अनेकदा ऐकले आहे.
‘गहिरे रंग’ या नाटकाच्या वेळची ही आठवण आहे. या नाटकात नायिका तुरुंगात असते. त्यात एका दृश्यामध्ये सीमा आणि रमेश यांच्यात एक संवाद होता, ‘किती वर्ष मी तुरुंगात काढायची? 14 वर्ष…! 14 महिने…! 14 उन्हाळे…! 14 पावसाळे…’ हा संवाद म्हणताना रमेशजी दर खेपेला वेगवेगळे आकडे म्हणायचे. कधी 16 महिने, कधी 12 महिने, कधी 10 महिने… अशी चूक करायचे. त्यामुळेच सीन संपवून आत आल्यावर सीमाजी मला म्हणायच्या, ‘अगं आशा, आज माझी शिक्षा दोन वर्षांनी वाढली गं…!’ त्यांनी ‘12 वर्ष’ या आकड्यानिशी संवाद म्हटला तर त्या म्हणायच्या, ‘आज त्यानं शिक्षेची दोन वर्ष कमी केली.’ अशी सगळी गंमत चालायची… नाटकाच्या दौर्यावर जायचो तेव्हा आम्ही सगळे एकत्र राहायचो. त्यानिमित्तानेही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळायचे.
या नाटकात माझी एका भाबड्या मुलीची भूमिका होती. यातला माझा गेटअप ‘गुड्डी’मधल्या जया भादुरीच्या गेटअपसारखा होता. ही मुलगी शालेय अभ्यासात मागे होती. त्यामुळे ती एकेका इयत्तेत चार-पाच वर्षे काढत होती. अशी ही थोड्या विनोदी अंगाने जाणारी भूमिका साकारताना मला देव दाम्पत्याच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू अनुभवायला मिळाला. नाटकातली माझी ‘दुर्गी’ची व्यक्तिरेखा त्यांना इतकी आवडायची की आपला प्रवेश संपल्यानंतर मेकअप रूममध्ये न जाता ते माझा अभिनय पाहण्यासाठी विंगेत थांबायचे.
तुम्हाला माझा कोणता सीन आवडतो, असे मी एकदा त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘ते आम्ही सांगणार नाही. कारण यामुळे तू तोच विचार करशील आणि अभिनयातली सहजता हरवून बसशील.’ माझ्या अभिनयात कृत्रिमता येण्याचा धोका लक्षात घेऊन त्यांनी कधीच मला त्यांचा आवडता सीन सांगितला नाही. दुसर्याचा इतका विचार करणारे अभिनेते आता दिसतील का? सीमाताईंकडून मी अभिनयातले बारकावे शिकले पण कसे जगावे, अडचणींना कसे तोंड द्यावे हे मी रमेशजींकडून शिकले. रमेश देव आपल्याला सोडून गेले. वय वाढले की वयाचे आकडे वाढतात आणि एक दिवस निसर्ग आपले काम करतो. पण रमेशजींच्या मनाला कधीच वाढत्या वयाचा स्पर्श झाला नाही. तो माणूस चिरतरुण होता. त्यांच्या चेहर्यावरचे हास्य कधीच ढळले नाही. त्यांनी कधीच कोणाला कमी लेखले नाही. मेहनतीने यश मिळवणार्या रमेशजींनी कधीही यशाचा अभिमान मिरवला नाही. मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम करणार्या रमेशजींचे पाय कायम मातीचेच राहिले. मुख्य म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी वृत्तीतली ही सकारात्मकता आणि शरीर-मनाचे आरोग्य जपले. अखेरपर्यंत ते मनमोकळे बोलत होते.
रमेशजींच्या अभिनयात एक प्रकारची सहजता होती. चित्रपटात आधी कलाकाराचा चेहरा बोलला पाहिजे आणि मग संवाद आले पाहिजेत. रमेशजींमध्ये हे नेमकेपणाने दिसायचे. कारण प्रत्येक भूमिकेसाठी ते अपार मेहनत घ्यायचे. ‘वेगळं व्हायचंय मला’ हे त्यांचे नाटकही खूप गाजले. बाळ कोल्हटकर, राजा परांजपे, राजा नेने असे ख्यातनाम चेहरे त्यात होते. या नाटकाचेही अनेक दौरे झाले. यावेळची एक आठवण संस्मरणीय आहे. या नाटकाच्या तालमी मुंबईला बिर्ला क्रीडा हाऊसमध्ये व्हायच्या. आम्ही सगळे कलाकार तिथे जमायचो. त्यावेळी सीमाताईंची मुले लहान होती. एकदा 11-12 वर्षांचा अजिंक्य तालमीला आला होता. आमचे काम सुरू झाल्यावर तो बोट हाऊसच्या आजूबाजूला खेळू लागला. बाहेर बिर्ला शेटचा उंच पुतळा होता. खेळता खेळता तो त्या पुतळ्याच्या चौथर्यावर चढला आणि जवळपास मध्यापर्यंत गेला. तो कुठे दिसत नाही हे लक्षात येताच इकडे सीमा आणि रमेशजी काम सोडून त्याला शोधायला बाहेर पडले. त्यांच्याबरोबर आम्हीही बाहेर आलो. बाहेर बघतो तो लहानगा अजिंक्य चौथर्यावर चढलेला दिसला. त्याबरोबर सीमा घाबरल्या आणि त्याला हाका मारून खाली बोलावू लागल्या. तेवढ्यात रमेशजींनी त्यांना थांबवले आणि म्हणाले, ‘नलू, गडबड करू नकोस.(रमेशजी सीमा देव यांना ‘नलू’ अशी हाक मारायचे.) त्याला बिचकवू नकोस.’ असे म्हणत ते अजिंक्यला म्हणाले, सावकाश वर चढ आणि त्यांच्या पायाला नमस्कार करून खाली ये. अर्ध्यातून खाली यायचे नाही. हे बोलतानाचा त्यांचा करारी चेहरा मला अजूनही आठवतो. ते रमेशजी मला अधिक भावले. त्यांच्यातल्या खंबीर पित्याने आपल्या मुलाला अर्ध्या वाटेतून परतवले नाही तर नेहमी पुढेच जाण्याची शिकवण दिली. त्यामुळेच त्यांची दोन्ही मुले या क्षेत्रात वेगळी ओळख टिकवून आहेत. रमेशजींना विनम्र आदरांजली. त्यांच्या अशा अनंत आठवणी सतत बरोबर राहतील.
आशा काळे,
प्रसिद्ध अभिनेत्री
मोठा कलाकार हरपला ‘माहेरची साडी’च्या वेळी माझी रमेश देव यांच्याशी खरी ओळख झाली. अजिंक्यमुळे ते बर्याच इव्हेटस्ना यायचे. हसतमुख चेहरा, कमालीचा उत्साह ही त्यांची वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवायची. अलीकडेपर्यंत ते मालिकेमध्ये काम करताना भरपूर मेहनत घेत असल्याचे मी पाहिले. वयाच्या 86 व्या वर्षी एखाद्या मालिकेमध्ये काम करणे आणि अत्यंत दमवणार्या वेळा सांभाळत संवाद पाठ करणे हे निश्चितच सोपे नाही. त्यासाठी देवाची देणगीच असावी लागते. वेळेत येणे, कामाची शिस्त पाळणे हे कोणी त्यांच्याकडून शिकावे. त्यांच्यातला उत्साह अखेरपर्यंत अचंबित करणारा होता. एखाद्या तरुणाच्या तडफेने ते रात्री उशिरापर्यंत काम करताना दिसायचे. एकदा सकाळी गाठ पडली तेव्हा ते चहा आणि पोळीचा नाश्ता करताना दिसले. याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘नाश्त्यामध्ये मी काहीही तेलकट खात नाही. हा परफेक्ट नाश्ता आहे. मी जेवणाची सगळी पथ्ये पाळतो. रात्री न जेवता केवळ ग्लासभर गरम दूध घेतो.’ यावरूनच त्यांच्या आरोग्यसंपन्न जीवनाचे रहस्य मला समजले होते. कृष्णधवल काळापासून अगदी आतापर्यंतच्या काळापर्यंतच्या कामाचा त्यांचा आलेख आणि आवाका खूप मोठा आहे. एवढी मोठी कारकीर्द गाजवणे अभावानेच पाहायला मिळते.
अलका कुबल, प्रसिद्ध अभिनेत्री