Saturday, May 4, 2024
Homeधुळेकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करा-पालकमंत्री अब्दुल सत्तार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करा-पालकमंत्री अब्दुल सत्तार

धुळे – dhule

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. आरोग्य सुविधांचे

- Advertisement -

बळकटीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताकाचा 72 वा वर्धापन दिन सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभ, क्रीडा पुरस्कार वितरण, गुणवंतांचा सत्कार आणि कोरोना विषाणूच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे शहराचे महापौर प्रदीप कर्पे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती

धोडमिसे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री श्री. सत्तार यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते समाजकल्याण विभागाने तयार केलेल्या व्हीजन डॉक्यूमेंटचे प्रकाशन करण्यात आले.

पालकमंत्री श्री.सत्तार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या सरकारची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. आताही रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केला पाहिजे.

कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14 लाख 1 हजार 179 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर 9 लाख 59 हजार 778 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्करला बूस्टर डोस देण्यास सुरवात झाली आहे. अद्याप ज्या नागरिकांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी लसीकरण करून घ्यावे.

ऑक्सिजनयुक्त एक हजार 668 बेड, 160 व्हेन्टिलेटर उपलब्ध आहेत. ऑक्सिजन प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

आतापर्यंत 205 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 18 वारसांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले

आहेत. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 13 बालकांना पाच लाख रुपयांप्रमाणे 65 लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. बालसंगोपन योजनेंतर्गत 458 बालकांना दरमहा 1100 रुपयांप्रमाणे अनुदानाची तरतूद केली आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नऊ हजार 705

लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांप्रमाणे 1 कोटी 94 लाख 10 हजार रुपये, तर तीन हजार रुपयांप्रमाणे 2 कोटी 91

लाख 15 हजार रुपयांचा निधी वितरीत केला आहे. याशिवाय आठ हजार 205 लाभार्थ्यांना 1500 रुपयांप्रमाणे 1 कोटी 23 लाख 7 हजार 500 रुपयांची मदत करण्यात आली आहे. घरेलू कामगार कल्याणकारी मंडळातर्फे एक हजार 135 लाभार्थ्यांना 17 लाख 2 हजार पाचशे रुपयांचा निधी वितरीत केला आहे.

कोरोना काळात धुळे जिल्ह्यातील 65 हजार 676 पात्र आदिवासी लाभार्थी बांधवांना खावटी अनुदान 2 हजार रुपये प्रमाणे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. तसेच 63 हजार लाभार्थ्यांना धान्य किट वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी निधीही दिला जात आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून कोविड -19 विषाणू आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सन 2021-22 करिता पहिला हप्ता म्हणून तीन कोटी 40 लाख 36 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकाने धुळे जिल्ह्यातील 45 हजार 74 खातेदार शेतकऱ्यांना 342 कोटी 72 लाख रुपयांची कर्जमुक्ती दिली आहे. याबरोबरच राज्य शासनाने नव्या नमुन्यातील सातबारा उतारा शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत दोन लाख 92 हजार 755 खातेदारांना तीन लाख 37 हजार सातबारा उताऱ्यांचे वाटप केले आहे. धुळे जिल्ह्यातील 44 हजार 715 शेतकरी सभासदांना 494 कोटी 71 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले.

रब्बी हंगामातही पीक कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मोबाईल ॲपद्वारे ई- पीक पाहणी आज्ञावली विकसित केली आहे. ई- पीक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सक्रिय आणि व्यापक सहभाग आवश्यक आहे. आतापर्यंत आपल्या धुळे जिल्ह्यातील 1 लाख 81 हजार 890 शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणीत सहभाग नोंदविला आहे. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे रब्बीचा हंगाम चांगला होईल.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या 72 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. असे असले, तरी प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने ‘कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020’ जाहीर केले आहे. कृषीपंप चालू देयकांची नियमित भरणा करण्यासाठी कृषी ग्राहकांना वीज बिलामध्ये भरीव सूट दिली. शेतकऱ्यांचे वीज बिल कोरे करण्याचा आणि कृषी क्षेत्रातील वीजपंपासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यात येतील.

दिवसा वीज पुरवठा करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. कृषीपंप वीज जोडणी धोरणामध्ये कृषी पंप ग्राहकांना वीज बिलाच्या व्याज आणि विलंब आकारात 66 टक्क्यांपर्यंत पर्यंत सूट दिली आहे.

या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. 31 मार्च 2022 पूर्वी 66 टक्के पर्यंत सवलत घेवून ‘वीज बिल कोरे’करून घ्यावे. या योजनेत कृषीपंप ग्राहकांचा सहभाग महत्वाचा आहे. वीज बिलाच्या वसूल झालेल्या रक्कमेतून 33 टक्के ग्रामपंचायत व 33 टक्के जिल्हा पातळीवर हा निधी पायाभूत सुविधेसाठी वापर होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन पालकमंत्री श्री. सत्तार यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या