Saturday, November 16, 2024
Homeनगरनागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ शेकडो कोपरगावकर रस्त्यावर

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ शेकडो कोपरगावकर रस्त्यावर

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- नागरिकत्व सुधारणा कायदा (सिटीझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहिमेच्या समर्थनार्थ कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध भागांतील शेकडो नागरिकांनी मंगळवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली. भारत माता की जय, वंदेमातरम् अशा घोषणा देत नागरिकांनी रस्त्यालगत मानवी साखळी करून केंद्र सरकारला पाठिंबा दर्शविला. या कायद्यामुळे देश जोडला जाईल अशी आग्रही भूमिकाही मांडली.

नागरिकत्व कायदा आणि एनआरसी मोहिमेवरून शहरासह तालुक्यात वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. दोन दिवसांपूर्वी विविध संस्था-संघटनांतर्फे या कायद्याला आणि मोहिमेला विरोध दर्शविला होता. त्यानंतर मंगळवारी या कायद्याच्या समर्थनार्थ शहराच्या विविध भागांतील नागरिक रस्त्यावर उतरले. समाजमाध्यमातूनही या समर्थन रॅलीत सहभागी होण्याची हाक देण्यात आली होती. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून सकाळी 11 वाजता हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, सावरकर चौक, कन्या शाळा, गांधी नगर, टिळक नगर मार्गे तहसील कार्यालयात पोहचला.

- Advertisement -

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना कायद्याच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले. वुई सपोर्ट सीएए, प्रेम-एकात्मतेचा प्रसार करा, अफवांचा नाही, असे फलक हाती घेऊन आणि मोदी-शहा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, सीएए तो झाँकी है, एनआरसी अभी बाकी है, अशा घोषणा नागरिक देत तहसील कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी मानवी साखळी करण्यात आली. या कायद्याला सर्व भारतीयांनी पाठिंबा दिला पाहिजे. काही राजकीय व्यक्ती दूषित राजकारण करून, धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आपसांत दरी निर्माण होत आहे. मात्र हा कायदा योग्य असून, त्यामुळे देश जोडला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्यातून कायद्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते.

यावेळी महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरी महाराज, उंडे महाराज, नगराध्यक्ष विजय वहाडने, नगरसेवक सत्येन मुंदडा, विजय वाजे,अ‍ॅड. जयंत जोशी, विवेक सोनवणे, विनायक गायकवाड, दिलीप सारंगधर, गणेश शिंदे, चेतन खुबानी, सुनील बंब, ऋषिकेश बोराडे, संजय सोनवणे, विजय कासलीवाल, चेतन राणे, गौरव गुप्ता, बाळासाहेब जाधव, कृष्णा जाधव, सुभाष शिंदे, उंडे महाराज, राहुल सूर्यवंशी, संतोष गंगावाल, अशोक लकारे आदींसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या