नाशिक । Nashik
पाच वर्षांच्या दीर्घ खंडानंतर राज्यात काँग्रेसने सत्तेत पुनरागमन केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्ष आता स्थिरवला आहे. त्यानंतर पक्षातील मरगळ झटकून नवचैतन्य आणण्यासाठी संघटनेत जिल्ह्या-जिल्ह्यांतील नेतृत्वाची ‘भाकरी’ फिरवण्यास प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुरुवात केली आहे.
गटबाजीने ग्रासलेल्या नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसमध्ये थोरात यांनी लक्ष घातले आहे. शहर व जिल्हा नेतृत्वात खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने प्रदेश पातळीवरून इच्छुकांची चाचपणीही सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जिल्हास्तरावर पक्ष संघटनेतील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने लक्ष घातले आहे.
दरम्यान, नाशिकशहर व जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल करा, अशी आग्रही मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. याला प्रमुख कारणही वाढती गटबाजी हेच आहे. गटबाजीच्या लागलेल्या ग्रहणामुळे नाशिकच्या काँग्रेस भवनलाही उतरती कळा लागली आहे. राज्यात पक्ष सत्तेत आल्यानंतर पक्षाला ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र पक्षाअंतर्गत मरगळच हटत नसल्याने थोरात यांनी स्वत: नाशिकच्या पक्ष संघटनेत लक्ष
पुरवून बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण जिल्हा काँग्रेसमध्येही बदल करण्याचा निर्णय प्रदेशपातळीवर अंतिम झाल्याचे वृत्त आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, माजी आमदार अनिल आहेर, प्रसाद हिरे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, दिगंबर गिते यांच्या नावाची चर्चा आहे.
कार्यकर्ते देता का कोणी?
एकेकाळी ‘काँग्रेसचा बालेकिल्ला’ अशी नाशिक जिल्ह्याची ओळख होती. या पक्षाचा जिल्ह्यात सध्या एकच आमदार आहे. गटबाजी आणि
जितके नेते, तितके गट अशी पक्षाची नवी ओळख अलीकडच्या काळात झाली आहे. याच गटा-तटांच्या राजकाराणामुळे बैठकीसाठी ‘कार्यकर्ते देता का कोणी?’ असे म्हणण्याची वेळ पक्षावर आली आहे.