टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
गेली आठ वर्षे खंडपिठाच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या टाकळीभान विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचा खंडपिठात निकाल लागताच सत्ता स्थापनेसाठी दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. आठ वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाविरुध्द गावगाड्याचा पॅनल करुन लढत दिलेले व गेल्या आठ वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेल्याने गावपुढारी मात्र, आता बहुमताची गोळा बेरीज करु लागल्याने सत्तेसाठी दावा ठोकु लागले असले तरी सभासद सहमतीच्या बाजूने कौल देताना दिसत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय प्रतिष्ठेच्या असलेल्या टाकळीभान सेवा संस्थेची सदस्य मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 10 एप्रिल 2016 रोजी झाली होती. मुळ सभासद व बाहेरगावचे सत्ताधारी गटाने केलेले सभासद या मुळ मुद्यावर निवडणूक जाहीर होण्यापुर्वीच या संस्थेचा वाद न्यायालयात गेला होता. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असतानाच सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ठरल्या वेळी निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र, बाहेरगावच्या सभासदांची मतदार यादीतील नावे वगळण्याच्या मागणीसाठी संभाजीनगर खंडपिठात याचिका दाखल असल्याने खंडपिठाने मुळ सभासद व बाहेरगावचे सभासद यांचे दोन वेगवेगळ्या मतपेट्यांमध्ये मतदान घेण्याचे, मतमोजणी व अंतीम निकाल घोषीत न करण्याचे प्राधिकरणाला आदेश दिले होते.
त्यामुळे दोन्ही गटाच्या 26 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होते. याबाबत खंडपिठात वेळोवेळी सुनावणी होवून सुमारे एक वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजे 15 मार्च 2017 रोजी दोन्ही मत पेट्यांमधील झालेल्या मतांची मोजणी करुन अंतीम निकाल घोषित न करता खंडपिठाला अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही सुमारे सात वर्षे खंडपिठात न्यायालयीन लढा सुरुच होता. वेळोवेळी सिंगल व डबल बेंचसमोर लढा चालु आहे. दरम्यानच्या कालावधीत संस्थेवर प्रशासकीय राज सुरु होते.
अखेर 4 एप्रिल 2024 रोजी खंडपिठाचे न्यायमुर्ती मेहेरे यांनी सुनावणी पुर्ण करुन 30 एप्रिल 2024 रोजी बाहेरगावच्या सभासदांचे झालेले मतदान विचारात न घेता मुळ सभासदांच्या मतमोजणीचा अहवाल अंतिम धरुन ग्रामविकास मंडळाच्या 13 उमेदवारांना जास्तीची मते मिळाल्याने निवडणूक प्राधिकरणाने त्या तेरा उमेदवारांना विजयी घोषित करण्याचे आदेश दिले. खंडपिठाच्या या निर्णयाने ग्रामविकास मंडळाच्या उमेदवारांना जल्लोष साजरा केला. निवडणुकीत ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी आ.स्व.जयंतराव ससाणे, माजी आ.भानुदास मुरकुटे व माजी आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 2016 रोजी निवडणूक लढवली गेली होती. मात्र, गेल्या आठ वर्षात राजकारणात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. राजकीय समिकरण बदलली गेली आहेत. माजी आ. कांबळे गटाचे या संचालक मंडळात कोणी नसले तरी माजी आ.स्व. ससाणे समर्थक माजी सभापती नानासाहेब पवार आता ना. विखे गटात आहेत तर पवार समर्थकही त्यांच्याच सोबत आहेत. याचिकाकर्ते राहुल पटारेही सध्या विखे गटात आहेत.
माजी आ. भानुदास मुरकुटे यांचा सध्या स्वतंत्र गट असल्याने त्यांचे समर्थक या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यामुळे या दोन्ही गटाकडून सत्तेचे दावे प्रतिदावे दबक्या आवाजात सुरु झाले आहेत. संख्या बळाची चाचपणी दोन्ही गटांकडून सुरु झाली आहे. गेली आठ वर्षे मतपेटीत बंद असलेले सदस्यही आता गावात फेरफटका मारताना चमकु लागले आहेत. त्यामुळे या निकालाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळुन निघताना दिसत असले तरी सभासद मात्र, सहमतीने व आदर्श पध्दतीने सेवा संस्थेचे कामकाज नूतन संचालक मंडळाने करावे या बाजुने कौल देताना दिसत आहेत. मात्र, काहीही असले तरी येत्या काही दिवसात होणार्या पदाधिकारी निवडीत काय होणार हे पहाण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.