समाजात घडणार्या विविध बर्या-वाईट घटनांवर परखड बोलणार्या कलावंत आणि विचारवंतांची समाजात वाणवा आहे. सत्ताधीशांच्या उदोउदोत रमणार्या खूशमस्कर्यांचा आजकाल जमाना आहे. तरीही निर्भीडपणे परखड भाष्य करणारे मोजके कलावंत भारतीय अभिनयसृष्टीत आजही मौजूद आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले त्यापैकीच एक! नाट्यभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणीचा छोटा पडदा अशी तिहेरी करमणूक क्षेत्रे आपल्या कसदार आणि दमदार अभिनयाने गाजवणारा हा चतुरस्त्र अभिनेता! अभिनयाची परंपरा लाभलेल्या परिवारातून गोखले पुढे आले. जुन्या पिढीतील प्रतिभावान अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे ते सुपुत्र! पित्याचा अभिनय वारसा पुढे नेऊन तो समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. देखणे आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व, दमदार आवाज, संवादफेक आणि अभिनयातील परस्परपूरक कुशलता त्यांच्या ठायी होती. अभिनयाचा वारसा असला तरी अभिनय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी आणि नंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांना सुरूवातीला बरेच कष्ट घ्यावे लागले. मुंबईत आल्यावर ओळखीच्या ठिकाणी रात्री विश्रांती घेण्यापुरती जागा मिळवून टॅक्सीचालक होऊन, अगदी लग्नकार्यात भांडी विसळण्यापर्यंतची कामे त्यांनी कमीपणा न बाळगता निमूटपणे केली. प्रतिकूलतेवर मात करून पुढे आल्याची शेखी त्यांनी कधी मिरवली नाही. बालकलाकार म्हणून त्यांचा अभिनयात श्रीगणेशा झाला. नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी साकारलेल्या आव्हानात्मक भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरल्या. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक, पण ‘बॅरिस्टर’ नाटकाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. मराठी चित्रपटसृष्टीला देखण्या अभिनेत्यांची संपन्न परंपरा लाभली आहे. विक्रम गोखले यांनी त्या परंपरेला आपल्या अभिनयाने चारचांद लावले. ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटात त्यांनी साकारलेला हळवा नायक प्रेक्षकांना भावला. पुढे अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची छाप सोडली. ‘वजीर’ या मराठी चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘आघात’ चित्रपटातून दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी स्वत:ला आजमावले. ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचा हा लाडका विद्यार्थी होता. मेहता यांच्या मुशीत घडलेला हा अभिनेता शेवटपर्यंत अभिनयातच रमला. ‘गोदावरी’ या चित्रपटातून त्यांचे अखेरचे दर्शन घडले. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी कारकीर्द करण्याची संधी फार थोड्या मराठी कलाकारांना मिळाली. गोखले यांनी आपल्या सशक्त अभिनयाची छाप अनेक हिंदी चित्रपटांवर सोडली. छोट्या पडद्यावरील मराठी आणि हिंदी मालिकांमधूनही त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. केवळ अभिनय करायचा म्हणून नव्हे तर मिळालेल्या भूमिकांचा अभ्यास करून त्या ताकदीने साकारण्याला त्यांनी सदैव प्राधान्य दिले. गोखले यांना अनेक गोष्टीत अभिरूची होती. वाचन आणि लेखनासोबतच माणसांच्या गाठीभेटी घेण्यातही त्यांना विशेष रस होता. सामाजिक व राजकीय घडामोडींबाबत गोखले सजग असत. त्यावर निर्भीडपणे भाष्य करायलाही ते कचरत नसत. मराठी भाषा आणि शब्दांतील अचूकतेबद्दल ते जागरूक होते. त्याचा अनुभव नाशिकमध्ये नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात आयोजकांना आला. 2012 मध्ये त्यांना वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमस्थळी लावलेल्या फलकावरील शुद्धलेखनाच्या चुका त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. त्याबद्दल नाट्य परिषदेच्या पदाधिकार्यांना सुनावण्यासही ते कचरले नव्हते. गोखले यांना उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांची प्रकृती सुधारत असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी डॉक्टरांकडून आल्यावर कुटुंबियांसह त्यांचे असंख्य चाहते सुखावले होते, पण शनिवारी पुन्हा त्यांची तब्येत बिघडली आणि अखेर त्यांच्या निधनाची बातमी आली. सहा दशके अभिनय क्षेत्र गाजवणारा विक्रम गोखले नावाचा ‘अभिनयसम्राट’ आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. तरीही प्रेक्षक आणि चाहत्यांच्या हृदयात त्याचे स्थान दीर्घकाळ राहील.