हवामान बदलांचे दृश्य परिणाम आपण आता अनुभवू लागलो आहोत. जगातील सर्वात उष्ण ठिकाण असलेल्या कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये गतवर्षी आणि यंदा 54.4 अंश सेंटिग्रेड तापमान नोंदले गेले. युनिसेफच्या ताज्या अहवालानुसार, हवामान बदलामुळे दक्षिण आशियाई देशांतील मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. येणार्या काळात हवामान बदलांमुळे अकल्पित घटनांची वारंवारिता वाढणार, हे अटळ आहे.
मोहन एस.मते मुक्त पत्रकार
हवामान बदलामुळे जगभरात सध्या अकल्पित घटना घडताना दिसत आहेत. गेल्यावर्षी रशियाचा सर्वात मोठा भूभाग असलेल्या सायबेरियातील वरखोयनस्क शहरात 100.4 अंश फॅरनहाईट म्हणजे 38 अंश सेंटिग्रेड इतके तापमान नोंदले गेले होते. या तापमान नोंदीला संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतीच अधिकृत मान्यता दिली आहे.
वरखोयनस्क या शहराचे तापमान 1885 पासून मोजले जात आहे. सायबेरियातील उष्णतेच्या लाटेच्या वेळी ते मोजले गेले. गेल्यावर्षी उन्हाळ्यात आर्क्टिक सायबेरियात सरासरी तापमान 10 अंश सेंटिगे्रडने जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे जंगलात आगी लागून समुद्रात बर्फाचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या वर्षाची ही उष्णतेची सर्वात तीव्र लाट होती. जगातील सर्वात उष्ण ठिकाण असलेल्या कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये गेल्यावर्षी आणि यंदा 54.4 अंश सेंटिग्रेड तापमान नोंदले गेले. त्याची पडताळणी अद्यापही जागतिक हवामान संघटना करत आहे.
युनिसेफने मुलांवर लक्ष केंद्रित करणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. याला क्लायमेट क्रायसिस अ चाईल्ड राईटस् क्रायसिस : चिल्ड्रेन एट रिस्क इंडेक्स (सीसीआरआय) असे नाव देण्यात आले आहे. हवामान बदलामुळे दक्षिण आशियाई देशांतील मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे संशोधन या अहवालातून प्रसिद्ध झाले आहे. या अहवालात चक्रीवादळ आणि उष्णतेच्या लाटांसारख्या पर्यावरणीय धोक्यांपासून मुलांचे संरक्षणाच्या धोक्यांचे मूल्यांकन कण्यात आले आहे. त्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भारत या चार दक्षिण आशियाई देशांत जेथे हवामान संकटाच्या परिणामामुळे मुलांना सर्वाधिक धोका आहे.
जागतिक खराब हवामानाचा पिकांना फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणावर पिके वाया गेल्याने आगामी कालावधीमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू अधिक महाग होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये प्रचंड उष्णतेमुळे पिके वाळून गेली आहेत. युरोपमधील अनेक देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्यामुळे उभी पिके वाहून गेली होती. ब्राझील हा साखरेेचा मोठा उत्पादक देश. पण गेल्या काही महिन्यांपासून तिथे थंडीबरोबरच दुष्काळाची परिस्थिती असल्याने पिकांना पाणी देणेसुद्धा अवघड झाले आहे. या देशामध्ये अतिथंडीचा फटका कॉफी पिकाला बसला आहे. चीनमध्ये आलेल्या महापुरामुळे जनावरांमधील रोगाचे प्रमाण वाढले. या नुकसानीकडे आपण वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा संपूर्ण जागतिक कृषी अर्थव्यवस्थाच कोलमडून जाऊ शकते.
जून आणि जुलै महिन्यात भारतासह पश्चिम जर्मनी आणि बेल्जियमध्ये मोठे पूर आले. ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये सलग 17 ते 20 दिवस पाऊस झाला. मात्र पूर येण्यास पाऊस हेच एकमेव कारण नसून समुद्राच्या भरतीमुळेही पूरस्थिती निर्माण होत असते, असे अभ्यासकांचे मत आहे. हवामान बदलांमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. भरतीच्या वेळी वादळ आल्यास पूरस्थिती अधिक गंभीर होते.
‘नासा’ आणि हवाई विद्यापीठाने केलेल्या नव्या संशोधनातून भविष्यातील संकटाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार चंद्राच्या कक्षेतील बदलांमुळे तसेच हवामान बदलामुळे 2030 च्या मध्यावर समुद्राची पातळी वाढून भरती अधिक मोठ्या असतील. त्यामुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतात. चंद्राच्या कक्षेतील नैसर्गिक हालचालींचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. चंद्राच्या कक्षेतील असा बदल 1728 मध्ये आढळून आला होता. चंद्राची सूर्याभोवती कक्षा सपाट नाही. या कक्षेमध्ये काही प्रमाणात चढ आणि उतार होत असतात. त्यामुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतात. नेमकी याच काळात वादळे आल्यास पुराची तीव्रता वाढू शकते, असे संशोधनात म्हटले आहे. चंद्राच्या कक्षेतील हालचालींच्या विस्ताराचा मोठा टप्पा 2030 मध्ये येणार आहे. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.
समुद्राची पातळी वाढत असताना किनारपट्टी भागातील संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अधिक तयारी करणे गरजेचे असून त्यासाठी किनारपट्टी भागातील लोकांचे स्थलांतर करणे किंवा समुद्रकिनारी मोठ्या भिंती बांधण्याऐवजी पुराचा एकंदर परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामध्ये पूरस्थितीत तग धरू शकतील असे बांधकामाचे आरेखन आवश्यक आहे. तसेच विशिष्ट पूरप्रवण क्षेत्रात शहर विकास कमी करण्याचा समावेश आहे. त्यामुळे पूर आल्यास पायाभूत सुविधांचे नुकसान होणार नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजत असताना जगभरातील टॉप-100 प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 46 शहरांतील नागरिकदेखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र समोेर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगातील आघाडीच्या दहा प्रदूषित शहरांमध्ये भारतातील शहरांचा समावेश आहे.
भारतातील गाझियाबाद या शहराची हवा सर्वाधिक विषारी आहे. भारत, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील तब्बल 98 शहरांची हवा अधिक विषारी होत चालली आहेे. पुढील काही वर्षांत ही परिस्थिती न बदलल्यास या शहरांमध्ये राहणे कठीण होणार आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
2021 संपूर्ण वर्ष हे वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींनी व्यापले होते. भारताच्या तीनही समुद्रकिनार्यांवर येऊन गेलेली चक्रीवादळे, त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये दोन वेळा आलेली मध्यम स्वरुपाची वादळे, केरळ, तामिळनाडू या राज्यांना बसलेला पावसाचा तडाखा आणि देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये सतत पाऊस कोसळत असल्याचे चित्र हवामान बदलांच्या परिणामांची सुरुवात झाल्याचे द्योतक आहेत. ऑक्टोबर महिन्यात उत्तराखंडामध्ये पावसाने धुमाकूळच घातला. केदारनाथ, बद्रीनाथ या भागातील अनेक लोकांना स्थलांतरीत करण्याची वेळ आली. त्यानंतर केरळमध्ये पाऊस झाला. तामिळनाडूचे चेन्नई शहर जलमय झाले होते. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये पावसाने धिंगाणा घातला. प्रसिद्ध देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या परिसरात ढगफूटी झाल्यासारखे चित्र होते. अचानकपणे आलेल्या या पावसाने 15-20 जणांचे बळी घेतलेले आहेत. महाराष्ट्रात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कोकणामध्ये दोन वेळा चक्रीवादळे आली. भर पावसाळ्यामध्ये चिपळून, खेड या अन्य परिसरात अभूतपूर्व पाऊस झाला आणि कोट्यवधीचे नुकसानही झाले. पावसाळ्यात पाऊस येणे आणि अवेळी पाऊस येणे यात आता काही फरकच राहिलेला नाही. बारमाही पाणी असेल तर बागायत शेती करता येते. परंतु आता पावसाळ्याचेच बारमाही कोसळणे सर्वच हंगामातल्या शेतीला नुकसानकारक ठरते आहे.
गेल्या 5 ते 10 वर्षांतले वेगाने बदलणारे हवामान ही केवळ भारतापुरती समस्या राहिलेली नाही. जागतिक स्तरावर सतत वाढत असलेले वायुप्रदूषण, कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे वाढलेले तापमान याचा हा सगळा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतासारखा शेतीप्रधान आणि विविधता असलेल्या समाज जीवनासाठी तो आर्थिक, सामाजिक आव्हान ठरतो आहे. जागतिक स्तरावर हवामान बदलांबाबत होणार्या परिषदांमध्ये त्या-त्या देशांना उपाययोजना करण्याचे आवाहन केले जात आहे. पण भारताने तेवढ्यापुरतेच प्रयत्न ठेवणे अपुरे असून भारताची संपूर्ण भौगोलिक स्थिती आणि इथले समाजजीवन लक्षात घेऊन या बदलत्या हवामानाचा अतिशय गांभीर्याने अभ्यास होणे आवश्यक बनले आहे.