Friday, June 14, 2024
Homeनगरढगाळ हवामानाचे संकट

ढगाळ हवामानाचे संकट

अहमदनगर (प्रतिनिधी) – वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होत आहेत. किमान तापमानातही मोठी घसरण होत असून थंडी, गारठ्याचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणाचे सावट असल्याने रब्बी पिके संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये आजार बळवण्याची भीती व्यक्त केली जात आहे

- Advertisement -

या बदलत्या हवामानामुळे हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कांदा पिकावर पिवळा, तांबडा करपा पडू लागल्याने पिके धोक्यात आली आहेत. तसेच धुक्याचे प्रमाण कमी असल्याने आंबण्याची प्रक्रिया होत नसल्याने या पिकांची वाढही खुुंटली आहे. गव्हाचीही तीच स्थिती आहे. वांगी व वेलवर्गीय भाज्यांवर तुडतुडा व मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. गहू व कांद्याचे क्षेत्र मोठे आहे. सुरुवातीपासूनच रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.

सततचे ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी यामुळे गव्हावर मावा तर आला आहेच मात्र, कधी न येणारी अळीही यंदा गव्हावर दिसू लागली आहे. तसेच परिसरातील उन्हाळी कांद्याचे रोप परतीच्या पावसाने गेले, मात्र आहे त्या रोपामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अजूनही शेतकरी कांदा लागवड करत आहेत. या हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यावरही करप्याने आक्रमण केल्याने नवीन लागवड धोक्यात आली आहे.

पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांनी विविध औषधांनी फवारणी सुरु केली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत.
दरम्यान, स्कायमेट हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, वातावरणातील वरच्या थरात मध्य पूर्व अरबी समुद्रापासून पूर्व राजस्थानपर्यंत कोकण किनारपट्टीलगत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारत आहे. ही प्रणाली आणखी दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि पश्चिम विदर्भावर आर्द्र वार्‍यांचा परिणाम होत आहे.
या वार्‍यांच्या पार्श्वभूमीवर पुढील 24 ते 48 तासांत या हवामान विभागांवर गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य-महाराष्ट्रात जसे की पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. दरम्यान, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, सातारा, डहाणू, जळगाव, जालना आणि अकोला येथे विखुरलेला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हवामान कोरडे राहील.रात्रीच्या तापमानात 1-2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे, तर ढगाळ वातावरण आणि त्यानंतरच्या पावसामुळे दिवसाच्या तापमानात 2-4 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

आजार बळावण्याची भीती
बदलत्या हवामानामुळे ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी अशाप्रकारचे आजार बळावू लागले आहेत. रुग्णालयांतही रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे. दमा असणार्‍यांनाही अधिक त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या