अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईत होणार्या मोर्चाला सत्ताधारी पक्षातील अनेक मराठा नेत्यांचा आतून पाठिंबा असल्याचा दावा करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या नेत्यांना उघड पाठिंबा देण्यापासून रोखत असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला. फडणवीस त्यांचे बिले अडकवून ठेवतात, सरकारी अधिकार्यांवर व मंत्र्यांवर दबाव आणतात आणि त्यांच्याबरोबर मराठा चळवळ संपविण्याचा कट रचतात, असा थेट आरोप त्यांनी रविवारी (दि. 10) अहिल्यानगरमध्ये केला.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण व ओबीसी प्रवर्गात समावेश या मागण्यांसाठी होणार्या या मोर्चाच्या नियोजन बैठका घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी सांगितले, गोव्यात ओबीसी मेळाव्यात फडणवीस यांनी ओबीसींसाठी लढण्याची भाषा केली. पण मराठा समाज दिसत नाही का? ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महामंडळे निर्माण करूनही निधी दिला जात नाही. निवडणूक जवळ आली की ओबीसींची काळजी दाखवली जाते. जरांगे यांनी आणखी आरोप करताना म्हटले, फडणवीस यांनी प्रत्येक मंत्र्याला स्वतःच्या मर्जीतील ओएसडी दिले आहेत, जे मंत्र्यांवर लक्ष ठेवतात. इतर पक्षातील मराठा नेत्यांना बळजबरीने भाजप व सत्तेत आणले जाते. माझ्या दोन वर्षांच्या आंदोलनामुळे 58 लाख मराठ्यांचा कुणबी प्रवर्गात समावेश झाला, ज्याचा लाभ सुमारे तीन कोटींना झाला. आता 29 ऑगस्टला निर्णायक लढाई होणार आहे. निर्णय होईपर्यंत माघार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारकडून अजून कोणताही संपर्क न झाल्याचे सांगून जरांगे म्हणाले, मागच्या वेळी मी माघारी फिरलो तेव्हा अधिसूचना घेऊन आलो होतो, पण सहा महिन्यांत अंमलबजावणी झाली नाही. यावेळी मात्र मागे हटणार नाही. शरद पवार यांच्या मंडल यात्रेबाबत मत विचारल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, जातीय संघर्ष लावण्याचा प्रयत्न फडणवीस करत असून दंगली घडवायची योजना आहे, परंतु मराठे आणि ओबीसी यामध्ये दंगली होणार नाहीत. जातगणनेबाबत केंद्र सरकारचा उद्देश स्पष्ट नसल्याचे सांगून जरांगे म्हणाले, आम्हाला फक्त सरसकट ओबीसी आरक्षण हवे आहे. आता चर्चा नको, थेट कृती हवी. ती होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक गावातून नियोजन
मोर्चासाठीच्या तयारीबाबत मनोज जरांगे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मी राज्यभर नियोजनासाठी बैठका घेत आहे. यावेळी पहिल्यापेक्षा पाचपट अधिक मराठा बांधव मुंबईत येतील. प्रत्येक गावातून ‘एक घर, एक वाहन’ या पध्दतीने नियोजन केले आहे. यावेळी मुंबई जिंकून यायचे आहे. 29 ऑगस्टला सर्वांनी यावे यासाठी प्रत्येक मराठा बांधवांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून निरोप द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
…तर विधानसभेत पडले कसे
निवडणुकीत मत चोरी झाल्याचे वाटत नाही, पण लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पडले कसे, हा प्रश्नच आहे. मत चोरी झाल्याचे मला वाटत नाही, परंतु लोकसभेला धडाधड निवडून आलेले विधानसभेला पडले कसे हा प्रश्नच आहे, पडणारे ही तीन ते चार हजार मतांनी पडले. मात्र त्यांनी आता खचून न जाता नव्याने उभे राहावे, असा सल्ला जरांगे यांनी दिला.
3 कोटी मराठ्यांना न्याय
माझ्या दोन वर्षाच्या आंदोलनात 58 लाख मराठ्यांना कुणबीमध्ये समावेश केला गेला. यापैकी प्रत्येकाच्या कुटुंबातील चार पाचजण जरी गृहीत झाले, तरी तीन कोटी मराठ्यांना मी कुणबीचा लाभ मिळवून दिला आहे, असा दावा करून जरांगे म्हणाले, माझ्यामुळे जात एक झाली. हजारो नोकरीला लागले. सर्व जातीच्या मुलींना मोफत शिक्षण मिळाले.मागच्या वेळी मी माघारी फिरलो असलो तरी त्यावेळी सगेसोयर्यांची अधिसूचना घेऊन आलो होतो, दुर्देवाने सहा महिन्यात त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे माझी ही आरपारची लढाई असेल असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
भुजबळ म्हणजे बिघडलेलं मशीन
मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यास छगन भुजबळांचा विरोध आहे. ओबीसी समावेश पडताळणीस अक्षेप घेतला आहे. परंतु भुजबळ हे बिघडलेले मशीन आहे. त्याचे नटबोल्ट पडले आहेत. देशात संविधान आहे. कायदा आहे. आमच्या आरक्षणाला भुजबळांचा विरोध आहे. हिंदू मोठा व्हावा असे त्याला वाटत नाही का, असा सवाल त्यांनी केला. फडणवीस हे स्वतःला ओबीसी नेता असल्याचे जाहीर करतात, मग त्यांनी कोणत्या धनगर, कैकाडी, लिंगायत या समाजाचे कल्याण केले. त्यांनी मराठा, मुस्लिम, दलित यांना झुंजवले. हिंदू धर्म टिकवायचा असेल तर गरीब लेकरा बाळांचे कल्याण केले पाहिजे. परंतु ते आम्हाला आपसात लढवून आमचेच मुडदे पाडायला निघाले आहेत, असाही आरोप त्यांनी केला.
जातगणनेचा उद्देश अस्पष्ट
पुढच्या वर्षीपासून सुरू होणार्या जातगणनेचा उद्देश अजून स्पष्ट झालेले नाही. ही जातगणना बजेट नियोजनासाठी आहे की आरक्षणासाठी हे अजून केंद्र सरकारने जाहीर केलेली नाही. मात्र, ज्या जातीची लोकसंख्या जास्त त्या जातीला आरक्षणातून वगळल्या याचा काही विषय होऊ शकत नाही, कारण केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे या संदर्भात काही निकष आहेत असा दावा करून जरांगे म्हणाले आम्ही दहा टक्के आरक्षण किंवा ईडब्ल्यूएस मागितले नव्हते. आम्हाला फक्त सरसकट ओबीसी आरक्षण पाहिजे. त्यामुळे आता चर्चा नाही फक्त कृती हवी आहे. धनगर व मुस्लिम आरक्षणाचा विषय पण मी हाती घेतला आहे व त्यांना मीं आरक्षण मिळवून देणारच, असे सांगत आमच्या आंदोलनातून सरकारला कोंडीत पकडण्याचा कुठलाही उद्देश नाही. परंतु दोन वर्षात आमच्या आंदोलन काळात निवडणुका आल्या यात आमचा काय दोष असा सवालही त्यांनी केला.




