Wednesday, November 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, ४ लाख १५ हजार...

शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, ४ लाख १५ हजार थकबाकीदारांना फायदा

दुष्काळी मदतीचे ५ हजार रुपयेही या आठवड्यात होणार जमा

मुंबई | Mumbai

राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) आणि अडचणीत सापडलेल्या बळीराजाला ऐन सणासुदीच्या काळात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने (State Government) मोठा निर्णय घेतला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत कर्जमाफीची चौथी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, या टप्प्यात ४ लाख १५ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यासोबतच, राज्यातील १.५० कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची तातडीची दुष्काळी अग्रीम मदत देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

- Advertisement -

कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर; ४ हजार कोटींचा निधी मंजूर

कर्जमाफी योजनेच्या तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश केल्यानंतर, सरकारने आता दिवाळीपूर्वी चौथी यादी प्रसिद्ध केली आहे. सहकार विभागाने ४ लाख १५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (loan Waiver) ४ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सोपवला आहे. राज्य शासनाने आतापर्यंत एकूण २५ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी १५ लाख ८५ हजार ४९३ शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले असून, यासाठी तब्बल १३ हजार २७५ कोटी रुपये थेट बँक खात्यांत वर्ग केले आहेत. या योजनेचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील ६ लाख २७ हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे. अद्याप ४ लाख ८२ हजार शेतकऱ्यांचे केवायसी (KYC) होणे बाकी असून, आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नजीकच्या ‘आपले सेवा केंद्रावर’ जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कर्जमुक्ती योजनेचे मुख्य निकष

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान वितरित झालेले, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पीककर्ज यास पात्र आहे. २ लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जांसह पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना पूर्ण कर्जमुक्ती दिली जात आहे. १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील सर्व व्याज आणि इतर खर्च पूर्णपणे माफ करण्यात आले आहेत.

दुष्काळग्रस्त १.५० कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत

यंदाच्या तीव्र दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील १.५० कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी एकूण ७ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च होणार असून, याच आठवड्यात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

बँका, फायनान्स कंपन्यांना सक्त ताकीद

शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत जमा झाल्यानंतर कोणत्याही बँकेने कर्जाच्या वसुलीपोटी ही रक्कम कापून घेऊ नये, असे कडक आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच दुष्काळाच्या काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या किंवा मुजोरी करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश कॅबिनेट बैठकीत देण्यात आले आहेत.

३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना

जमीन महसुलात सूट आणि पीककर्जांच्या वसुलीस स्थगिती.

शेतीपंपाच्या वीजबिलात सूट आणि टंचाईग्रस्त भागातील वीजजोडणी खंडित न करणे.

शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ.

रोहयो (MGNREGA) अंतर्गत नियमांत शिथिलता आणून कामांना गती देणे.

आवश्यक तिथे पिण्याचे पाणी, टँकर्स आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करणे.

शेतमजूर व बाधितांना अन्नधान्य पुरवठा आणि जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित हॉटेल

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai शिर्डी विमानतळ परिसरात उभारण्यात येणार्‍या पंचतारांकित हॉटेलमुळे शिर्डीच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल. तसेच विमान प्रवाशांसह देश-विदेशातून येणार्‍या साईभक्तांना दर्जेदार निवास आणि...