मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) पहिल्याच दौऱ्यात महाराष्ट्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ६,२५,४५७ कोटींवर गुंतवणूक करार झाले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी टाटा समूह महाराष्ट्रात ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वांच्या व्यक्तींशी गाठभेट करत त्यांच्याशी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे.
रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्यात १५,००० मेगा वॅट पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.
शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा केली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच त्यांनी केले.
मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा