मुंबई | Mumbai
मुंबईसह २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारीला (गुरुवारी) पार पडणार आहे. या निवडणुकांचा प्रचार थंडावला आहे. मुंबईसह २९ महापालिकांमध्ये काय होणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत ठाकरे बंधुंवर हल्लाबोल केला. तसेच महापालिका निवडणुकीत विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मराठी माणसाचा विकास केला म्हणजे काय केले? 25 वर्षांत मराठी माणसाला मुंबईबाहेर जावे लागले, हा विकास नाही. परप्रांतियांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे विकास नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावला. तसेच आमचे हिंदुत्व हे पूजा पद्धतीवर अवलंबून नाही, तर प्राचीन भारतीय जीवनपद्धती मानणाऱ्यांना आम्ही हिंदू मानतो असेही ते म्हणाले.
मराठी माणूस हा महाराष्ट्रात सुरक्षित असला पाहिजे
ठाकरे बंधूंनी मराठी आणि अमराठी असा भेदभाव करत निवडणूक लढण्याचा खूप प्रयत्न केला. पण मराठी माणूस संकुचित नाही. महाराष्ट्रात क्षेत्रीय अस्मिता आहे, मराठी भाषा अभिमान आहे. कल्याण झालं पाहिजे आणि मराठी माणूस हा महाराष्ट्रात सुरक्षित असला पाहिजे असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
मराठी माणसाला गृहीत धरुन जो प्रयत्न
मराठी माणूस हा महाराष्ट्रात सुरक्षित असला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे याबाबत कुठलंही दुमत असू शकत नाही. नुसत्या वल्गना करायच्या म्हणजे मराठी माणसाचा विकास नाही. दोन उत्तर भारतीय ऑटो ड्रायव्हरला झापड मारणं हा मराठी माणसाचा विकास नाही. आम्ही ८० हजार मराठी माणसांना बीडीडी चाळीत हक्काचे घर देऊन दाखवले. जो मराठी माणूस वसई, विरारच्या पुढे गेला असता त्याला आम्ही मुंबईत घर दिले आहे. त्यामुळे मराठी माणूस यांच्यासोबत नाही, अमराठी माणूसही यांच्यासोबत नाही. मराठी माणसाला गृहीत धरुन जो प्रयत्न यांनी केला आहे तो पूर्णपणे अयशस्वी झाला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आमचे हिंदुत्व संकुचित नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही हिंदुत्त्व नाही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली. हिंदुत्व आणि विकास वेगळे होऊ शकत नाही. आमचे हिंदुत्व संकुचित नाही. आमचे हिंदुत्व हे पूजा पद्धतीवर आधारित नाही. भारतीय संस्कृती, प्राचीन भारतीय जीवनपद्धती मानणाऱ्यांना आम्ही हिंदू मानतो, आम्ही त्यांना सोबत घेऊ चालू. त्यामुळे मराठी आणि हिंदू हे वेगळे होऊ शकत नाही.”
कुठल्याही छोट्या गोष्टींचं भांडवल करायचं
अण्णामलाईंचा जिथवर संबंध आहे. मी इतकंच सांगेन की तामिळनाडूचे नेते आहेत. अनेकवेळा मद्रास येतं, मद्रासी येतं. तिथे चेन्नई म्हटलं पाहिजे. त्यामुळे आपण म्हणतो ना बोलता बोलता. तसं अण्णामलाईंनी बॉम्बे म्हटलं याचा अर्थ त्यांना मुंबईचा अपमान करायचा हा हेतू नसतो. कुठल्याही छोट्या गोष्टींचं भांडवल करायचं आणि ज्या शब्दांमध्ये ते (राज ठाकरे) अण्णामलाईंना बोलले आहेत मग हा तमिळ लोकांचा अपमान नाही? देशात मराठी माणसांनी तमिळ लोकांचा अपमान करायचा, तमिळांनी हिंदी भाषिकांचा अपमान करायचा असा देश आपल्याला चालवायचा आहे का? मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे आणि सगळ्या भाषांचा सन्मान केला पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत.




