मुंबई | Mumbai
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलतांना ‘घाटकोपरची भाषा गुजराती आहे, तर गिरगाव येथे हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणाऱ्याला मराठी बोलता (Marathi Language) आलंच पाहिजे असं काही नाही”, असे वक्तव्य केले होते. भैय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आज विधानसभेच्या (Vidhansabha) दोन्ही सभागृहांत उमटतांना दिसले. यानंतर विरोधकांनी जोशी यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, “भैय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, ते पूर्णपणे ऐकून माहिती घेऊन बोलेन. पण सरकारची भूमिका पक्की असून मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता यायल पाहिजे. माझ्या या वक्तव्यात भैय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. इतर कोणत्याही भाषेचा अपमान करणार नाही, सर्व भाषांचा सन्मान आहे. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो तो दुसऱ्याही भाषेवर प्रेम करू शकतो म्हणूनच शासनाची भूमिका पक्की असून शासनाची भूमिका मराठी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भैय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी बोलतांना त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की,”मराठी ही आमची राज्यभाषा आहे. मुंबईची भाषा मराठी नाही हे भैय्याजी जोशी यांनी राजद्रोहाचे विधान केले आहे. कालपासून दोन विषय असवस्थ करणारे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाचा आज निषेध करावा. हे औरंगजेबापेक्षाही भयानक कृत्य आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या विधानाचा धिक्कार करावा. भैय्याजी जोशी यांनी मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान केला आहे. लाचार आणि देशद्रोही सरकार असल्याने यावर बोलणार नाही”, असे त्यांनी म्हटले.