त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज (दि.२३) रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) नियोजनासाठी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी सर्वप्रथम त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले. दर्शनानंतर फडणवीस यांनी कुशावर्त तीर्थ येथे भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी तीर्थराज कुशावर्तावरील सिंहस्थातील नियोजनासंदर्भात माहिती दिली.
दरम्यान, यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरामधील (Trimbakeshwar Temple) आवारात असणाऱ्या सत्संग पेंडॉलमध्ये साधू-महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा अनुभव विचारात घेऊन नियोजन करण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. तसेच साधू-महंतांनी मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याचा कारभार स्वतःकडे ठेवावा अशी मागणी करून त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासंदर्भात बैठक त्र्यंबकेश्वर येथे घेण्याची मागणी केली. याशिवाय काही मंडळींबाबत तक्रारी देखील मांडल्या. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मी स्वतः त्र्यबकेश्वरच्या साधू-महंतांच्या (Sadhu -Mahant) संपर्कात राहील’, असे आश्वासन साधूंना दिले.
तसेच काही साधू-महंतांनी कुंभमेळ्याचा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असा उल्लेख होत असल्याने या कुंभमेळ्याचा उल्लेख त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असा करावा, अशी मागणी केली. यावर बोलतांना फडणवीस यांनी सांगितले की, “नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो. आपण नाशिक या करीता म्हणतो की, नाशिक लोकांना अधिक माहिती आहे. पण त्र्यंबकेश्वरचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही एकत्र असलेले शिवलिंग त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणून आपल्या संपूर्ण अध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचा दर्जा अत्यंत वर आहे. त्यामुळे त्यांनी जी काही मागणी केली आहे त्या मागणीचा आम्ही विचार करू”, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
दरम्यान, यावेळी महामंडालेश्वर शंकरानंद सरस्वती, महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, महामंडालेश्वर धनंजय गिरी, महामंडालेश्वर महेंद्र गिरी, महामंडालेश्वर गोपालदास, महामंडालेश्वर संजय पुरी, महामंडालेश्वर संजय गिरी, महामंडालेश्वर दयानंद भारती, महामंडालेश्वर जयदेवगिरी, महामंडालेश्वर अजय पुरी, महामंडालेश्वर कैलाश भारती, महामंडालेश्वर अनंतपुरीजी, महंत ठाणापती शांतिगिरी महाराज यांच्य्यासह सर्व दहा आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित होते.
‘महाजन कुंभमेळा मंत्री नको, तुम्हीच कुंभमेळ्याचा कारभार हाती घ्या‘
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि.२३) रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन पाहणी करणार असल्याने या दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) नाशकात ठाण मांडून बसले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला वेळोवेळी सूचना करण्याचे काम केले. या दौऱ्याच्या निमित्ताने काल (दि.२२) रात्री महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथील बडा उदासीन आखाड्याचे महंत रघुमुनी यांची भेट घेतली. परंतु, या भेटीचे पडसाद आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी बघायला मिळाले. महंत रघुमुनी यांना बडा उदासीन आखाड्याने विविध आर्थिक तक्रारीमुळे बहिष्कृत केले आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील सर्व दहा आखाड्यांच्या महंतांनी रघुमूनी यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटू नये, अशी नाराजी प्रशासनाला कळविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात रघुमुनी यांची भेट निश्चित होती. मात्र, या संदर्भात दहा आखाड्यांच्या साधू-महंतांनी उग्र भूमिका घेतल्याने प्रशासन सावध होत मुख्यमंत्र्यांना याबाबत सूचित करून महंत रघुमूनी यांची भेट रद्द केली. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील साधू समाधानी झाले. यावेळी साधू-महंतांनी अप्रत्यक्षपणे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी (CM) कुंभमेळ्याचा कारभार स्वतःच आपल्या हाती घ्यावा, असे म्हणत तुम्ही चांगले काम करून सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करू शकतात, असे म्हटले.