नवी दिल्ली | New Delhi
राज्यात पाऊस (Rain) वेळे आधीच माघारी परतल्याने महाराष्ट्रात दुष्काळी (Maharashtra Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून सुरुवातील २६५ आणि नंतर १९ अशा एकूण २८४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांमधील पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. तसेच दिवाळीच्या आधी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांना दिली. तसेच राज्यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांना (Farmer) मदत करण्यासाठी जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे अमित शाह यांच्याकडे केली आहे. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?
आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्रातील दुष्काळाच्या स्थितीवर विस्तृत चर्चा केली, संपूर्ण परिस्थिती सांगत राज्य सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांना दिली. एक निवेदन सुद्धा राज्य सरकारच्या वतीने दिले.महाराष्ट्रात २६५ पेक्षा अधिक तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळी उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत एनडीआरएफच्या वतीने अधिकाधिक मदत देण्यात यावी, अशी विनंती त्यांना केली.
महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत (Help) देण्यात येईल, असे आश्वासन मा. अमितभाई शाह यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारची चमू पाहणीसाठी ८ ते ११ ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार भक्कमपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहील, हे त्यांनी आश्वस्त केले, त्यासाठी मी त्यांचा अतिशय आभारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोस्टमध्ये म्हणाले आहेत.




