मुंबई | Mumbai
भाजप कधीच काचेच्या घरात राहत नाही, प्रदेश कार्यालयासाठी जी जागा घेतली ती स्वतःच्या खर्चाने घेतली आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. ज्या लोकांना जागा बळकावण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत आणि विरोधकांना लगावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (२७ ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते दक्षिण मुंबईत महाराष्ट्र भाजपाच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन पार पडले. दरम्यान या नव्या इमारतीसाठीच्या जागेवरून शिवसेनेच्या (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्यांनी वेगवेगळे दावे केले आहेत.
अमित शाह यांच्या हस्ते भुमिपूजन पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या सगळ्यांची इच्छा होती की मुंबईत आपल्या प्रदेश भाजपलाही चांगले कार्यालय मिळायला हवे. त्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी जागा शोधात होतो. त्यावेळेस आम्ही एक निर्णय केला होता की, सरकारी जागेच्या मागे न जाता आपल्याला खासगी किंवा परवडणारी जागा मिळेल अशा अनके जागा बघण्याचा प्रयत्न सुरु होता. मनोज कोटक यांनी ही जागा शोधून काढली आणि हळूहळू ही जागा आम्ही मिळवली. काही लोकांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी त्यांना सांगेन की, भाजप काचेच्या घरात राहत नाही. हमारे उपर पत्थर फेंकने का प्रयास मत करो,” ” असा इशारा त्यांनी यावेळी व्यासपीठावर बोलताना दिला.
विरोधक आरडाओरड करणार हे मला पहिल्या दिवसापासून माहिती होते असेही फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीस म्हणाले की, “मला पहिल्या दिवशी महिती होतं की, आपण ज्या वेळी कार्यालयासाठी जागा घेऊ, काही नतदृष्ट लोकं बसलेलेच आहेत. रोज ते प्रश्न विचारतील. त्यामुळे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की सरकारी जागा नको. जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेच सर्व नियम आपण पाळू कारण इकडच्या सर्व जागा लिजच्या जागा असतात. त्याची परवानगी घ्यावी लागते, पैसे भरावे लागतात.”कोणताही शॉर्टकट नको. त्यानंतर आम्ही सर्व परवानग्या घेत ही जागा घेतली आहे. त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकावण्याची सवय आहे, त्यांनी प्रश्न विचारू नये.” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जेव्हा सरकार आलं तेव्हा भाजपची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शाह यांनी घेतली. तेव्हा निर्णय घेण्यात आला की प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचं कार्यालय असावं. त्यावेळी शाहांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जागा घेतल्या खरेदी करण्यात आल्या. त्याठिकाणी भाजपचं कार्यालय बनवायला सुरुवात झाली. प्रमोदजी होते तेव्हा दादर मधील कार्यालय भव्य होतं. पण प्रदेशचं कार्यालय लहान होतं. अनेक अडचणी असताना देखील त्यातून भाजपचे काम चालायचं. 2014 च्या निवडणुकीत 15 दिवस अमित भाई या कार्यालयात बसून संचालन करायचे. मुंबईचा आवडीचा वडापाव खायचे.”
रोहित पवारांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी या जागेच्या मुद्द्यावर एक पोस्ट केली आहे. “आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाची जागा Lease Land असल्याचे, Shedule W ची जागा असल्याची तसेच lease renovation झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. Lease Land, Shedule W असलेली जागा lease renovation झाले नसल्यास विकता येते का? याचा खुलासा @mybmc आयुक्त करतील का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




