मुंबई | Mumbai
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु केले आहे. आज (सोमवारी) त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज तातडीने सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी शर्ती घालून जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी दिली होती. परंतु न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्तींचे पालन झाले नसल्याचे सांगत न्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने उद्या (मंगळवारी) दुपारी ४ वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता, इतर सर्व ठिकाणाहून मराठा आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आंदोलकांच्या वर्तणुकीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या सुनावणीनंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, आंदोलकांनावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे शासन काटेकोर पालन करेल. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन आंदोलकांकडून झाले असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच आंदोलकांकडून रस्त्यावर ज्या गोष्टी सुरू आहेत, त्यासंदर्भात देखील न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. गोष्टी सामंजस्याने झाल्या पाहिजेत हा सरकारचा प्रयत्न असतो. परंतु, न्यायालयाने कडक निर्देश दिल्यानंतर शासन आणि प्रशासनाला ज्या प्रकारची कारवाई करायची असते ती कारवाई करेल, असे स्पष्टपणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आंदोलकांच्या वागण्यावर फडणवीस नाराज
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आंदोलकांकडून महिला पत्रकारांवर हल्ला किंवा त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न हे आंदोलनाला गालबोट लावण्यासारखे आहे. काही आंदोलकांनी रस्ते बंद केले होते. परंतु अर्ध्या तासात पोलिसांनी रस्ते रिकामे केले. काही ठिकाणी घटना घडल्या, त्या नक्कीच भूषणावह नाही. आंदोलकांकडून नक्कीच अशी अपेक्षा नाही. परंतु अशा वागण्याचेही समर्थन होणार असेल तर राज्य कुठे चाललंय, याचा विचार व्हायला हवा. आपण यापूर्वी ३० पेक्षा जास्त मराठा मोर्चे पाहिलेले असून, त्यांची शिस्त पाहिली आहे. त्यावेळी सरकारने सकारात्मकतेने घेतलेला निर्णय आहेत. आपण सगळे छत्रपतींचे नाव सांगणारे लोक आहोत. अशा वागण्याने आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत आहोत का? याचा विचार आंदोलकांनी करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.





