मुंबई । Mumbai
भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना समोर आली आहे. जळगावमधील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात आणि देशात महिला सुरक्षेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एक वेगळा संशयही व्यक्त केला आहे.
‘दुर्देवाने या प्रकरणात विशिष्ट पक्षांचे काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केलंय. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. काहींना अटक देखील झालेली आहे. इतरांनाही अटक होईल. पण अशा प्रकारे छेडछाड करणं, सार्वजनिक ठिकाणी त्रास देणं, अत्यंत चुकीचं आहे. कुठल्याही परिस्थिती अशा लोकांना माफी देता कामा नये. आरोपींवर अतिशय कडक कारवाई होईल’, अशा शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय घडलं?
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर मुलांनी छेडछाड काढली. मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी रक्षा खडसे यांनी आक्रमक पावित्रा घेत तक्रार दाखल केली. यानंतर रक्षा खडसे यांनी नेमकं काय घडलं, याबद्दलची सविस्तर माहिती दिली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत मुक्ताबाईंची यात्रा असते. त्या यात्रेनिमित्त अनेक लोक सहभागी होत असतात. परवा रात्री मी गुजरातला होते. आज सकाळीच मी इथे आली. परवा माझ्या मुलींचा फोन आला, त्यांनी मला यात्रेत जायचं असं सांगितलं. मी त्यांना सांगितल की सुरक्षारक्षकाला सोबत घेऊन जा. तसेच तुझ्या मैत्रिणी आणि ऑफिसमधील दोन तीन लोकांना सोबत घेऊन जा. कारण दरवर्षी गर्दी असते. धक्काबुक्की होते. त्यामुळे थोडी सुरक्षा असायला हवी. पण तिथे गेल्यानंतर काही टवाळखोर मुलांनी त्यांचा पाठलाग केला, असे रक्षा खडसेंनी म्हटले.
त्यांच्या पाळण्यात शेजारी जाऊन बसले. आमच्या सुरक्षारक्षकाने त्यांना दुसऱ्या पाळण्यात बसवलं, तर तिथेही ही टवाळखोर मुलं त्यांना त्रास द्यायला लागले. तसेच सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की केली. मुलींचीही छेड काढली. सत्ता कोणाचीही असो, शेवटी प्रशासनाकडे जेव्हा तक्रार येतात, तेव्हा गंभीर कारवाई झाली पाहिजे. माझ्या मुलींसोबत पोलीसांच्या ड्रेसमधील माणूस असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडत असेल तर हे फार गंभीर आहे. मी मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा बोलली, त्यांनीही सूचना दिली आहे, अशी माहिती रक्षा खडसेंनी माहिती दिली.