मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील विविध भागातील मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता. त्यावर आज विधानसभेत भाजपा आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांनी मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२५ रोजी आदेश देऊन मशिदींसह प्रार्थना स्थळांकडून ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, असा मुद्दा उपस्थित करत लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे. रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत. सकाळी ६ ते रात्री १० वाजण्याच्या कालावधीत दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४४ डेसिबलची आवाज मर्यादा असली पाहिजे. कायद्यानुसार अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. पोलिसांनी याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचे आहे, अशी सध्या कायद्याची तरतूद आहे”, असे फडणवीस यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर निश्चित केली जाईल. जर पोलीस निरीक्षकाने याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल”, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. निश्चित कालावधीसाठीच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून (Police) परवानगी घ्यावी”,असेही त्यांनी म्हटले.
तर “ज्याठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल, त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही, याशिवाय भोंग्यांची जप्ती केली जाईल. तसेच, या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही? हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल. पोलीस निरीक्षकाने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही? याची तपासणी केली पाहिजे. त्यात भोंग्याचे डेसिबल मोजून आवाजाची मर्यादा ओलांडली असेल तर पहिल्या टप्प्यात प्रदूषण नियंत्रक मंडळाला सांगणे आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा परवानग्या न देण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.