मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण औरंगजेबच्या (Aurangzeb) कबरीच्या मुद्द्यावरून चांगलेच ढवळून निघाले आहे. औरंगजेबची कबर (Tomb) हटवण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे.अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या मुहूर्तावर भिवंडीत (Bhiwandi) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यावेळी उपस्थितांना त्यांनी संबोधित केले.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, “आज यातून एक संदेश निश्चितपणे जात आहे. या देशामध्ये महिमामंडन होईल. तर, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे होईल. पण औरंगजेबाच्या कबरीचे होणार नाही. औरंगजेबाच्या कबरीला (Aurangzeb Tomb) एएसआयने पन्नास वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे.ज्या औरंगजेबाने आमच्या हजारो लोकांची हत्या केली. त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागतं हे दुर्देव आहे. मात्र, या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण कधीही होऊ देणार नाही. जर कुणी कबरीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला तर, तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) देखील १८ पगड जातीच्या लोकांना एकत्रित केले. यात शेतकरी, बलुतेदार, यांना एकत्र केले. त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केले. आपल्याला देव, देश, धर्मकारिता लढायचे आहेत, यासाठी तयार केले, हे जे बीजारोपण त्यांनी केले. आपल्याला राजा, सिंहासनाकरता लढायचे नाही, देव, देश धर्माकरता लढायचे आहे. हे मावळे असे लढले की, खानाच्या लाखांच्या फौजा यायच्या, पाच हजार मावळे त्या लाखांच्या फौजांना पस्त करायचे. हे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केले” असे देवेद्र फडणवीस यांनी म्हटले.
तसेच “ज्या काळात या देशातील राजे, राजवाडे मुगलांची, परकीय आक्रमकांची मनसबदारी मिळवून त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते. ज्यावेळेला लढण्याची शक्ती क्षीण झाली होती, कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा निर्माण झाली होती, त्यावेळी आई जिजाऊंचे संस्कार घेऊन यातून मुक्तता मिळवण्यासाठी, या परकीयांना धडा शिकवला पाहिजे, यासाठी आई जिजाऊंनी शिवरायांना घडवले”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.