मुंबई | Mumbai
नाशिकच्या (Nashik) काठे गल्ली परिसरातील (Kathe Galli Area) अनधिकृत दर्ग्याच्या पाडकामावेळी मंगळवार (दि. १५) रोजी पहाटे दोन हजारांहून अधिकच्या जमावाने पोलिसांवर (Police) तुफान दगडफेक केली होती. या दगडफेकीत एकवीस पोलीस जखमी झाले होते. यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तसेच पाठलाग करून त्यांची धरपकड केली होती. याप्रकरणी १५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ३० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, “नाशिकमधील हिंसाचार (Violence) सुनियोजित होता. ठरवून दंगल (Riot) घडवण्याचा याठिकाणी प्रयत्न झाला. न्यायालयाच्या (Court) निर्णयानंतर तिथल्या नागरिकांनी स्वत: ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितले आणि त्याची सुरुवातही त्यांनीच केली. त्याचवेळी जी मंडळी दंगलीत दिसत आहेत त्यांनी जाणीवपूर्वक पोलिसांवर दगडफेक केली आणि दंगा केला. म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई (Action) करण्यात येत आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, काठे गल्ली सिग्नल परिसरातील रस्ता चार दिवसानंतर वाहतुकीसाठी आजपासून खुला झाला आहे. पोलिसांनी रस्त्यावरील बॅरीकेट्स हटवले आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी देखील अनधिकृत बांधकाम परिसरात पोलिसांचा (Police) बंदोबस्त मात्र कायम आहे. काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र अनाधिकृत बांधकामावरील कारवाईनंतर शहरात कोणताही अनुचित न घडल्याने पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.
१५०० जणांवर ४२ कलमांनुसार गुन्हा
पोलिसांवर हल्ला व जमाव जमविल्याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात एकूण १५०० जणांवर भारतीय न्याय संहितेची कलमे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व पोलीस (अप्रितीची भावना चेतावने) अधिनियम अशा ४२ हून अधिक कलम व अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तशी फिर्याद सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ यांनी सरकार पक्षाच्यावतीने दिली आहे. तर, तपास सहायक निरीक्षक सुधीर पाटील करत आहेत. अटकेतील संशयितांना जामीन मिळण्याची शक्यता धूसर आहे.