नाशिक | Nashik
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक होत आहे. या बैठकीसाठी फडणवीस काल रात्रीच (दि.२२) रोजी नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेत विधिवत महापूजा केली.
यानंतर कुशावर्त येथे पाहणी केली तसेच उपस्थित साधू, महंत यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काय करण्याची गरज आहे त्याचा आढावा घेतला. नाशिकच्या (Nashik) कुंभमेळ्याचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात असून त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) विकासासाठी स्वतंत्र १ हजार १०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ते, पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच पुढच्या महिन्यात काम सुरु झाले पाहिजे अशी तयारी सुरु असून हे काम दोन विभागतात वाटले जाणार असल्याने त्या दृष्टीने काम केले जाईल. याशिवाय कुंभमेळ्यात विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असून युपीप्रमाणेच नाशिकच्या (Nashik) कुंभमेळ्यासाठी कायदा तयार करण्यात येणार आहे”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीस पुढे म्हणाले की, “नाशिकला ११ नवे पूल (Bridge) होणार असून मोठ्या प्रमाणावर रस्ते (Road) तयार करण्याचा मानस आहे. साधुग्राम आणि एसटीपी प्लांटसाठी (STP Plant) देखील विशेष नियोजन करण्यात आले असून सर्वात आधी गोदावरी नदी प्रदूषणाच्या बाबत काम सुरू करणार आहे. याशिवाय नाल्याचे पाणी (Water) देखील एसटीपी प्लांटपर्यंत नेणार आहे. हे सर्व नियोजन आम्ही प्राधिकरणाच्या माध्यमातून करणार आहोत”, असेही त्यांनी सांगितले.
तसेच “केंद्र सरकारने (Central Government) कांद्यावरील (Onion) २० टक्के निर्यात शुल्क हटवले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य मंत्री आणि अमित शाह (Amit Shah) यांचे आभार मानतो. यापुढेही सरकार शेतकऱ्यांसाठी (Farmer) हिताचे निर्णय घेईल”, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.