मुंबई | Mumbai
महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातला (Ashok Kharat) आज (दि.२४) रोजी नाशिक सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा पाच दिवसांची म्हणजेच दि.२९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यायालयात सरकारी वकील आणि खरातच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यात सरकारी वकिलांनी खरातच्या विरोधात अनेक पुरावे आहेत, काही पीडित महिला आता हळूहळू तक्रारीसाठी पुढे येत असल्याचा दाखला देत कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.तसेच खरातकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याने ५ जणांचा नरबळी दिल्याचा संशय असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले. दरम्यान संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत निवेदन सादर करत खरातच्या कुकर्मांची माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की,”अशोक खरात प्रकरणात आरोपीने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी मागितले होते. या प्रकरणात नाशिक पोलीस ठाण्यात (Nashik Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरातच्या मोबाईलमध्ये पुरावा आढळून आला नाही. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी नीरज जाधव याने एआय फोटो व्हायरल केला नंतर तो डिलीट केला. त्यामुळे संबंधित महिलेला नीरज जाधवच्या विरोधात पुरावा देता आला नाही. परंतु या प्रकरणातील पीडित महिलांना विश्वासात घेऊन, त्यांचे समुपदेशन करून, कोणतीही ओळख सार्वजनिक न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आठ महिलांचे ३८ व्हिडीओ एका सासाक्षीदाराने दिले असून, त्या माध्यमातून तपास सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, “नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तक्रार केली . या महिलेला गुंगीचे औषध देऊन पतीला मारुन टाकेल असं सांगुन वारंवार बलात्कार केला. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास करत असताना सहा लाखांची रक्कम, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले. डीव्हीआर, रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे आणि फायर केलेले पाच काडतुसे मिळाली. खरात हा महिलांना संमोहित करून विधीच्या नावाखाली त्यांच्या पोटावरून हात फिरवत होता. तसेच त्यांच्या नको त्या ठिकाणी बोट घालून तीर्थाच्या नावाखाली त्यांना लघवी पाजायचा. आपण दैवी अवतार असल्याचे सांगत या प्ररकरणाची वाच्यता कुठेही केल्यास दैवी कोप होईल अशी धमकी देखील द्यायचा. यानंतर पीडित महिलांची ओळख पटवून त्यांना तक्रार देण्यास तयार केले. त्यानंतर दि. १७ मार्च रोजी अशोक खरातला अटक केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
खरातची संपत्ती किती?
आरोपी अशोक खरातच्या संपत्तीबाबत माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, खरात याच्याकडे १२ तोळे, तर त्याच्या पत्नीकडे २० तोळे सोने आहे. पत्नीच्या नावाने असलेल्या डीमॅट अकाऊंटवरून एक ते दोन लाखांची गुंतवणूक, पाच बँक खाती आहेत. आरोपीकडे ४० कोटी ८७ लाख रुपयांचे बाजारमूल्य आहे. तसेच मिरगाव (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे ३३ एकर जमीन स्वतःच्या नावावर, मिरगावमध्ये फार्महाऊस, पाथर्डी गाव-गव्हाणे गाव (ता. नाशिक) येथे १० एकर जमीन, सिन्नरमध्ये ६ एकर जमीन, शिर्डी (ता. राहता, जि. अहिल्यानगर) येथे साडेचार एकर जमीन स्वतःच्या नावे आहे.” “काकडी (ता. राहता) शिर्डी विमानतळ येथे ५.५ एकर जमीन, पाथर्डी फाटा नाशिक ८०० स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट, ओझर येथे चार गुंठ्याचे चार प्लॉट, आडगाव (ता.जि. नाशिक) पाच गुंठ्यांचा प्लॉट, पनवेलमध्ये चाळीस गुंठ्यांचा प्लॉट, कॅनडा कॉर्नर नाशिकमध्ये १८९ स्क्वेअर फुटाचे कार्यालय आहे. तर संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथे मुलगी सृष्टी हिच्या नावावर ११ गुंठ्यांचा प्लॉट, पुण्यात मुलीच्या नावावर प्लॉट, नाशिकमधील कर्मयोगी नगरमध्ये एक बंगला, शिर्डीमध्ये पार्टनरशिपमध्ये साई सिल्व्हर मंगल कार्यालय, सिन्नरमध्ये पाच जणांमध्ये मिळून सहा एकर जमीन”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
पोलिसांना व्हिडीओ कोणी दिले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”नाशिक पोलिसांनी अतिशय गुप्तपणे आणि चाणाक्षपणे अशोक खरात याच्यावर बुधवारी (दि.१८) रोजी रात्री अटकेची कारवाई केली. पोलीस महासंचालकांच्या निर्देशानंतर संवेदनशील आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथक खरातची चौकशी करीत आहे. खरात याच्या कार्यालयात काम करणाऱ्या नीरज जाधव याने पोलिसांना संबंधित व्हिडीओ दिल्याचे आतापर्यंत मानले जात होते. मात्र, योगेश भालेराव या व्यक्तीने आठ महिलांचे ३५ व्हिडिओ दिले आहे. त्यानंतर पुढे कारवाई करण्यात आली आहे. साक्षीदार योगेश भालेराव याला पोलिसांचे संरक्षण देण्यात येईल”, असं त्यांनी सांगितले.
खरातवर किती गुन्हे दाखल
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ गुन्हे दाखल झाले आहेत. यात काही महिलांचे जबाब घेऊन गुन्हे दाखल झाले आहेत. तर काही इतर गुन्हे आहेत. खरातच्या शिवनिका संस्थानची चौकशी करण्यात येत असून, या प्रकरणातील पीडित आणि आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेले पुजारी आणि इतर लोकांचेही जबाब घेतले आहेत. अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली असेल त्याला सोडण्यात येणार नाही. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून, त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईल असंही त्यांनी सांगितले.





