मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात मराठी हिंदी भाषेवरुन वाद सुरु असतानच भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबाबत चिथावणीखोर वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्तर प्रदेश, बिहारला या तिथे तुम्हाला पटक पटक के मारेंगे असे वक्तव्य केले होते. याच निशिकांत दुबे विरोधात महाराष्ट्रामध्ये अत्यंत आक्रमक वातावरण आणि संतापाची भावना असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबे यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घेऊ असे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा वाद पेटला आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दुबे नेमके काय म्हणाले ते मी पाहिले नाही. परंतु, ते जर असे काही म्हणाले असतील तर ते चुकीचे आहे. आपण सर्वजण कुठे चाललो आहोत हा मला प्रश्न पडला आहे. आपण इतके संकुचित कसे काय होत आहोत? मी माझ्या मराठी बांधवांबद्दल इथे बोलू इच्छितो, आमची संस्कृती काय आहे, आमचा इतिहास काय आहे, हे विसरून चालणार नाही.”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठे हे केवळ मराठी भाषा किंवा महाराष्ट्रासाठी लढले नाहीत. देशात हिंदवी स्वराज्य आणण्यासाठी मराठे लढले. मराठे पानिपतला कशाला गेले? तिथे जाऊन का लढले? अहमदशाह अब्दाली तेव्हा मराठ्यांना म्हणाला होता, मला केवळ पंजाब आणि बलुचिस्तान द्या, उरलेला भारत तुम्हाला ठेवा, मी त्याला मान्यता देखील देईन. अब्दाली याचा हा प्रस्ताव स्वीकारून मराठे अब्दालीबरोबर तह करू शकले असते. परंतु, मराठ्यांनी तसे केले नाही. ते अब्दालीला म्हणाले, आम्ही तुला एक इंच जमीन देखील देणार नाही. ही आमच्या देशाची भूमी आहे. त्यानंतर मराठे अब्दालीविरोधात लढले. पानिपतमध्ये लाखो मराठे मेले. परंतु, दहा वर्षात ते परत उत्तरेला गेले. त्यांनी दिल्लीवर आपला भगवा झेंडा फडकवला. हा मराठ्यांचा इतिहास आहे, तो विसरून चालणार नाही. त्यामुळे मराठी माणूस इतका संकुचित असूच शकत नाही.”
मुख्यमंत्री म्हणाले, “मराठी भाषेवरून आज जे काही चाललेय ते सगळे राजकारण आहे. सामान्य मराठी माणसाचे मराठी भाषेवर प्रेम आहे. तो मराठीसाठी अग्रही आहे. परंतु, हिंसा करणारा माणूस मराठी असू शकत नाही. निशिकांत दुबे म्हणतात, पटक पटक के मारेंगे, राज ठाकरे म्हणतात, डुबा डुबा के मारेंगे, या दोघांशीही आमचा काहीच संबंध नाही. जो महाराष्ट्रात येईल त्याचे आम्ही स्वागत करू. इथे कोणाशी दुर्व्यवहार होऊ देणार नाही. भारताचा कायदा जे काही सांगतो त्यानुसारच इथला कारभार चालेल.”
अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे. अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की याचा अर्थ स्पष्ट आहे हे मराठी भाषेचे विरोधक आहेत. लातों का भूत बातों से नही मानता. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा निशिकांत दुबेच्या स्वागतावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी महाराष्ट्र द्रोही असल्याचे म्हणत हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या क्षेत्रासाठी पायघड्या घालणार आहेत, त्यांना महाराष्ट्रातील खासदारांची चिंता नाही. महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकतात, त्यांची त्यांना चिंता नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





