पुणे | Pune
देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) पाकिस्तानी लोकांना (Pakistani People) देश सोडण्याची नोटीस दिली आहे. त्यांना परत जाण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. ४८ तासांत ते देश सोडून न गेल्यास त्यांच्यावर कारवाई (Action) करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. यानंतर आता पाकिस्तानी नागरिकांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात बोलतांना आणखी एक मोठे विधान केले आहे
भारत सरकारच्या (India Government) अल्टिमेटमनंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज (दि. २७ एप्रिल) शेवटचा दिवस आहे. मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवरून पाकिस्तानी रवाना होत आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द केले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना (Pakistani Citizens) दिलेले वैद्यकीय व्हिसा देखील २९ एप्रिलपर्यंतच वैध असणार आहेत..
यावेळी फडणवीस म्हणाले की, “मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काल (शनिवारी) गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी माध्यमांशी बोलतांना राज्यातील ४८ शहरात एकूण ५०२३ पाकिस्तानी नागरिक आढळल्याचे म्हटले होते. यात नागपूर शहरात सर्वाधिक २ हजार ४५८ तर ठाणे शहरात ११०६ पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत, असे कदम म्हणाले होते. तसेच यामधील फक्त ५१ पाकिस्तान्यांकडे वैध कागदपत्रे मिळाली आहेत. तर महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.